महाराष्ट्रात औरंगजेबाचे गोडवे सहन केले जाणार नाही -अनिल शिंदे
संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
नगर (प्रतिनिधी)- समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांनी मुघल शासक औरंगजेबाचे गोडवे गाऊन शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. आजमी यांच्या प्रतिमेस जोडे मारुन महाराष्ट्रातून चले जावचा इशारा दिला. तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूरपणे झालेल्या हत्येचा देखील निषेध नोंदवून यामधील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.
आजमी यांच्या निषेधार्थ घोषणा देत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील नराधमांना फाशी देण्याच्या जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, संभाजी कदम, संजय शेंडगे, सचिन शिंदे, संतोष ग्यानप्पा, सुरेश तिवारी, सुनील लालबोंद्रे, रविंद्र लालबोंद्रे, संदीप दातरंगे, घनश्याम घोलप, दत्तात्रय कावरे, अरुण झेंडे, विनोद शिरसाठ, दीपक थोरात, अभी हुच्चे, शुभम कावळे, अक्षय कोंडावार, आनंदराव शेळके, अभी दहिंडे, दिगंबर गेंट्याल, कुणाल (बंटी) खैरे, सुनील भिंगारदिवे, डॉ. गाडे, पै. महेश लोंढे, ओमकार शिंदे, अविनाश भिंगारदिवे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अनिल शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रात औरंगजेबाचे गोडवे सहन केले जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत असून, त्यांच्या राज्यात शत्रूंचे गोडवे गाऊन शिवप्रेमींच्या भावना दुखावण्यात आल्या आहेत. याचा शिवसैनिक निषेध करत आहे. औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, अशा प्रवृत्तींना औरंगजेबाच्या कबरी खाली गाडू, असा इशारा त्यांनी दिला. तर संतोष देशमुख यांची क्रूरपणे झालेली हत्या ही मानव जातीला काळीमा फासणारी असल्याचे स्पष्ट केले.
संभाजी कदम म्हणाले की, महाराष्ट्रात राहून औरंगजेबाचे गोडवे गाणारी प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे. ज्या औरंगजेबाने आपल्या वडिलांना 9 वर्षे कैदेत ठेवले, अशा व्यक्तीला आजमी आदर्श प्रशासक मानतात हे निषेधार्ह आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात हे सहन केले जाणार नाही. अशा व्यक्तींना महाराष्ट्रात राहायचा अधिकार नसून, त्यांना वेळप्रसंगी कायदा हातात घेऊन उत्तर दिले जाणार आहे. तसेच संतोष देशमुख हत्येच्या दोषारोपपत्रातील फोटोतून अमानुषपणे हत्या झाल्याचे समाजासमोर आले. यामुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाले असल्याचे त्यांनी सांगितले.