नागा साधू बद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध; हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या प्रकरणी कारवाईची मागणी
राऊत यांना काळे फासणाऱ्याला 1 लाख रुपयाचे बक्षीस -सचिन जाधव
नगर (प्रतिनिधी)- खासदार संजय राऊत यांनी नागा साधू बद्दल केलेल्या वक्तव्याचा नगर शहरात शिवसेनेच्या वतीने निषेध नोंदवून, राऊत यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करण्यात आले. दिल्लीगेट वेस समोर झालेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी सताप व्यक्त केला, तर हिंदू धर्मियांच्या भावना दुखावून साधू-संतांचा अपमान करणाऱ्या राऊत यांच्यावर कारवाईची मागणी केली.
शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाना साधताना कुंभ मेळ्यातील नागा साधूबद्दल हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारे बेताल वक्तव्याचा ठपका ठेवत शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने आंदोलन करण्यात आले. राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारुन ती पायाखाली तुडविण्यात आली. या आंदोलनात शहर प्रमुख सचिन जाधव, माजी महापौर शिलाताई शिंदे, माजी नगरसेवक पै. सुभाष लोंढे, अश्विनी जाधव, शोभना चव्हाण, तृप्ती साळवे, सलोनी शिंदे, युवा सेनेचे पै. महेश लोंढे, अमोल हुंबे, दिगंबर गेंट्याल, सुनिल लालबोंद्रे, रवी लालबोंद्रे, अभिषेक भोसले, रोहित पाथरकर, सचिन राऊत, नागेश शिंदे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सचिन जाधव म्हणाले की, संजय राऊत यांच्या बेताल वक्तव्याने ठाकरे सेना लयास गेलेली आहे. वारंवार महापुरुष व साधु-संतांबद्दल ते बेताल वक्तव्य करत आहे. त्यांनी नागा साधूबद्दल केलेल्या वक्तव्याने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. साधू-संतांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर राऊत यांना काळे फासणाऱ्याला 1 लाख रुपयाचे बक्षीस शिवसेनेच्या वतीने त्यांनी जाहीर केले.