जनतेच्या सेवेसाठी महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकविण्याचा शिवसैनिकांचा निर्धार
नगर (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या वतीने माजी मंत्री स्व. अनिल राठोड यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. मंगलगेट येथील शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात झालेल्या अभिवादन कार्यक्रमात स्व. अनिल राठोड अमर रहे! च्या घोषणा देण्यात आल्या.
या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव, दिलीप सातपुते, संभाजी कदम, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, दत्ता जाधव, प्रशांत गायकवाड, दत्ता कावरे, संजय शेंडगे, आप्पा नळकांडे, सुनील लालबोंद्रे, पै. महेश लोंढे, परेश लोखंडे, सलोनी शिंदे, शोभा चव्हाण, अनिता बहुले, सुरेश तिवारी, घनश्याम घोलप, पोपट पाथरे, पांडुरंग घोरपडे, नंदू बेद्रे, रवींद्र लालबोंद्रे, रवींद्र घोरपडे, शिवबा चव्हाण आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अनिल शिंदे म्हणाले की, शहरात हिंदुत्वाचा ठसा स्व. अनिल राठोड उमटवला. हिंदुत्वाचा वारसा जपून त्यांनी राजकारण व समाजकारण केले. नगरकरांच्या प्रश्नांना व हाकेला धावून जाऊन त्यांनी सर्वसामान्यांना आधार दिला. त्यांचा वारसा शिवसैनिक पुढे घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सचिन जाधव म्हणाले की, स्व. अनिल राठोड यांच्या रुपाने हिंदुत्वाचे वादळ संपूर्ण जिल्ह्यात घोंगावले. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी समाजकार्य केले. त्यांच्या जयंती, पुण्यतिथीला सर्व शिवसैनिक एकत्र येतात. सर्व शिवसैनिकांसाठी ते ऊर्जा स्थान होते. आजही त्यांचे विचार सर्व शिवसैनिकांना ऊर्जा देणारे असल्याचे त्यांनी सांगितले.
गणेश कवडे यांनी सर्वसामान्यांसाठी झटणारा नेता अनिल भैय्यांच्या रूपाने नगरकरांनी पाहिला. जनतेच्या सेवेसाठी महापालिकेवर पुन्हा एकदा शिवसैनिक भगवा फडकविणार आहे. हेच स्व. अनिल राठोड यांना खरी आदरांजली ठरला असल्याचे सांगितले. दिलीप सातपुते म्हणाले की, स्व. अनिल राठोड यांनी शहरात हिंदुत्व रुजवले व शिवसैनिक हिंदुत्वाचा वारसा पुढे चालवत आहे. त्यांच्या शिकवणीतून अनेक कार्यकर्ते घडले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.