• Sun. Mar 16th, 2025

शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचच्या वतीने

ByMirror

Oct 20, 2023

शेतकरी, बेरोजगार युवक व विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नावर सुरु असलेल्या उपोषणाला पाठिंबा

शेतकरी आत्महत्या, खाजगीकरण, कंत्राटीकरण व सरकारी शाळेचे व्यापारीकरण थांबविण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांचा वीज प्रश्‍न, बंद होत असलेल्या शाळा, नोकऱ्यांचे खाजगीकरण व कंत्राटीकरणाचा शासन निर्णय रद्द व्हावा व स्पर्धा परीक्षाची शुल्क वाढीचा निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर एका आठवड्यापासून सुरु असलेल्या सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब कोळसे यांच्या उपोषणाला शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. तर या मागण्यांवर राज्य सरकारने विचार करुन तातडीने निर्णय घेण्याचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांना देण्यात आले. यावेळी विचार मंचचे राज्य कार्याध्यक्ष सुनिल सकट, तालुका अध्यक्ष सुदाम ढेमरे, शहराध्यक्ष युनूस पठाण, उपाध्यक्ष किरण जाधव आदी उपस्थित होते.


शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारी पातळीवर होणारे प्रयत्न निष्फळ असून, कर्जबाजारीपणा, सावकारकीचा जाच, पिकांना भाव नसणे व नैसर्गिक संकटामुळे शेतीचे होत असलेले नुकसान अशा वेगवेगळ्या कारणांनी शेतकरी आत्महत्या करत आहे. शेतकऱ्यांना किमान दहा तास मोफत अखंडित वीज पुरवठा मिळणे अपेक्षित आहे. नोकऱ्याचे खाजगीकरण व कंत्राटीकरणामुळे भावी पिढीचे भवितव्य धोक्यात आले आहे. खाजगी कंपनीकडून कंत्राटी पध्दतीने होणारी भरती अन्यायकारक ठरणार आहे. समूह शाळा या गोडस नावाखाली राज्यातील 14 हजार शाळा बंद करणे म्हणजे फुले, शाहू यांनी घडवलेल्या महाराष्ट्राला कलंकित करणारी ही बाब आहे. सरळ सेवा परीक्षा घेण्याची जबाबदारी टीसीएस व आयबीपीएस या दोन संस्थांकडे दिली आहे.

राज्यात तब्बल 10 वर्षानंतर तलाठी, जिल्हा परिषद, वन विभाग, जलसंपदा विभाग, आरोग्य विभाग असे विविध विभागात भरती प्रक्रिया राबवली जात आहे. परंतु एक हजार रुपये परीक्षा शुल्क लागू केल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. स्पर्धा परीक्षेच्या एका पेपरसाठी एक हजार रुपये परीक्षा शुल्क मोजायचे झाल्यास विद्यार्थ्यांना दहा ठिकाणी फॉर्म भरायचा झाल्यास मोठा आर्थिक फटका सर्वसामान्य विद्यार्थ्यांना बसणार आहे. गोरगरीब जनतेवर अन्याय करुन सरकार खाजगी कंपन्यांचे खिसे भरण्याचे काम करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते कोळसे यांनी केला आहे.


कोळसे यांच्या उपोषणाला विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सक्रीय पाठिंबा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी दिवसाला किमान दहा तास मोफत अखंडित वीज पुरवठा करण्यात यावा, नोकऱ्यांचे खाजगीकरण, कंत्राटीकरण व सरकारी शाळेचे व्यापारीकरण थांबविण्याचे निर्गमीत केलेले शासन निर्णय रद्द करावे, स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणारे एक हजार रुपये परीक्षा शुल्क कमी करण्याची शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचच्या वतीने देखील मागणी करण्यात आली आहे. या मागणीची प्रशासनाने दखल घ्यावी अन्यथा रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *