शिक्षक दिनाचा उपक्रम
जात, धर्म, पंथाच्या पलीकडे जाऊन शिक्षक विद्यार्थ्यांना माणुस म्हणून घडविण्याचे काम करतो -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- जात, धर्म, पंथाच्या पलीकडे जाऊन शिक्षक विद्यार्थ्यांना माणुस म्हणून घडविण्याचे काम करत असतो. यातूनच सक्षम भारत घडत आहे. भवितव्य घडविण्यासाठी मुलांचा पाया सक्षम करण्याचे काम शिक्षक करत आहे. शिक्षक हा समाजाची पायाभरणीचे काम करत असून, त्यांच्यामुळे समाजव्यवस्था चांगल्या दिशेने जात आहे. शिक्षकांमुळे समाज व्यवस्था टिकून असल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.
शिक्षक दिनानिमित्त प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने शहर व उपनगरातील सर्व शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार जगताप बोलत होते. टिळकरोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिक्षकांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी जुबेर पठाण, हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, संयोजन समितीचे प्रा. माणिक विधाते, ज्ञानदेव पांडुळे आदी उपस्थित होते.
पुढे आमदार जगताप म्हणाले की, शिक्षकांची भूमिका समाजात महत्त्वाची आहे. पूर्वी असलेल्या मास्तरांची हातातली छडी कमी झाल्याने त्यांचा धाक विद्यार्थ्यांमध्ये सध्या कमी झाला आहे. चांद्रयान यशस्वी झाले त्याचे श्रेय देखील शिक्षकांना जात आहे. ज्या वैज्ञानिकांना शिक्षकांनी घडविले त्यांनी ही मोहिम यशस्वी केली. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे शिक्षक असतो. शिक्षकांचे उपकार व कृतज्ञता कोणीही फेडू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.
शहराच्या विकासात्मक विषयावर बोलताना आमदार जगताप यांनी सर्वसामान्य वर्गातील मुलांना अद्यावत शिक्षण मिळण्यासाठी सुमारे 165 पेक्षा अधिक शाळांना संगणकासह ई लर्निंगचे साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्यानंतर शहराच्या इतिहासात सर्वाधिक निधी आणण्यात आला. शहर व उपनगर भागात प्रत्येक ठिकाणी विकास कार्य सुरु आहे. भविष्यातील वीस वर्षाचे नियोजन करुन दर्जेदार रस्त्यांचे काम सुरु आहे. गणेशोत्सवानंतर मध्यवर्ती शहरातील रस्त्यांचे काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रारंभी सावित्रीबाई फुले व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकात प्रा. माणिक विधाते यांनी सात ते आठ वर्षापासून शिक्षकांचा गुणगौरव केला जात आहे. महिला दिन, सावित्रीबाई फुले व शिक्षक दिनानिमित्त शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक शिक्षकांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचे कार्य सातत्याने सुरु असल्याचे स्पष्ट केले. अन्सार शेख यांनी अध्यक्षपदाची सूचना मांडली. आप्पासाहेब शिंदे यांनी अनुमोदन दिले. यास्मिन काझी व सुधाकर सुंबे यांनी पुरस्कार्थींच्या वतीने मनोगत व्यक्त करून शिक्षक दिनी दरवर्षी पुरस्काराच्या रुपाने होणारे कौतुक स्फुर्ती देणारे असल्याचे सांगितले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शहर, उपनगरातील शाळा, महाविद्यालयातील 153 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जुबेर पठाण म्हणाले की, आजही शिक्षकांना समाजात मान-सन्मान आहे. समाज घडविण्याचे काम शिक्षक करत आहे. बदलत्या शिक्षण पद्धतीचा स्वीकार करून, अद्यावत डिजिटल शिक्षण प्रणालीने शिक्षक मुलांना घडविण्याचे काम करत आहे. आमदार जगताप यांनी विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षण मिळण्यासाठी शाळांना ई लर्निंगसाठी साहित्य उपलब्ध करून शिक्षण क्षेत्राला चालना देण्याचे काम केल्याचे सांगितले.
शिरीष मोडक म्हणाले की, परिस्थिती बदलण्याची ताकद शिक्षकांमध्ये आहे. विद्यार्थ्यांचे मन सुदृढ व निकोप केले तर आदर्श समाज निर्माण होणार आहे. शिक्षक हे समाज बदलाचे मुख्य घटक आहे. आमदार जगताप यांनी जिल्हा वाचनालयासाठी सावेडीत मोठा भूखंड दिली. त्या प्लॉटवर वाचनालयाची इमारत उभी राहिली असून, वाचन संस्कृती रुजविण्याचे काम त्यांनी केले. वाचनालय समृद्ध झाली, तर ते शहर सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध होतो. शैक्षणिक क्षेत्रासाठी त्यांनी कायमच मदतीचा हात दिला आहे. कन्फर्म मंत्री म्हणून त्यांच्याकडे नगरकरांच्या आशा लागल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खासेराव शितोळे म्हणाले की, शैक्षणिक धोरण बदलत आहे, शिक्षकांनी त्या बदलत्या धोरणाशी एकरूप होऊन ते अमलात आणावे. शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामे सांगितले जातात. शिक्षकांकडे असलेला इतर कामांचा बोजा कमी केल्यास, ते उत्तमपणे व दर्जेदार शिक्षण मुलांना देऊ शकतील. सोशल मीडियामुळे वाचन संस्कृती लोक पावली आहे. मुलांच्या हातात मोबाईल आल्याने मुलांच्या हातात पुस्तके निघून गेली. वाचन संस्कृती पुन्हा रुजविण्याचे काम शिक्षकांना करावे लागणार आहे. शहराला कर्तबगार आमदार लाभला असून, ते शिक्षण क्षेत्राला चालना देण्याचे काम करत आहे.
शिक्षणाधिकारी अशोक कडूस म्हणाले की, शिक्षकांचा सन्मान सोहळा, त्यांच्या कामाची पावती आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीला व उच्च पदावर गेलेल्या व्यक्तीला देखील शिक्षक घडवतात. कोणताही महान व्यक्ती शिक्षकांपुढे नतमस्तक होतो. आमदार जगताप यांनी सर्वसामान्यांच्या मुलांना अद्यावत शिक्षण मिळण्यासाठी महापालिका व इतर शाळांना ई लर्निंग चे साहित्य उपलब्ध करून दिले. दूरदृष्टी ठेवून शाळा सक्षम करण्याचे व शिक्षण क्षेत्राला चालना देण्याचे काम त्यांनी केले असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव कालापहाड यांनी केले. आभार ज्ञानदेव पांडुळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजन समितीचे बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, आप्पासाहेब शिंदे, प्रशांत नन्नवरे, संदीप भोर, बन्सी नरवडे, विठ्ठल उरमुडे, सुभाष येवले, शिवाजी म्हस्के, शेखर उंडे, राष्ट्रवादीचे सुरेश बनसोडे, मारुती पवार, सागर गुंजाळ, अमित खामकर आदींसह अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक, शिक्षक- शिक्षकेतर समन्वय समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.