महिलांनी समाजव्यवस्था बदलासाठी टाकलेले एक पाऊल क्रांतीकारक ठरणार -ॲड. निर्मला चौधरी
अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांनी समाजव्यवस्था बदलासाठी टाकलेले एक पाऊल क्रांतीकारक ठरणार आहे. स्वातंत्र्य लढ्यात देखील महिलांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. महिलांचे प्रश्न सुटण्यासाठी संघटन महत्त्वाचे ठरणार असून, सामुहिक लढ्याने समाजातील गंभीर प्रश्न देखील सुटणार आहे. क्रांती दिनी महिलांनी समाजातील अपप्रवृत्ती व महिलांना गुलामगिरीत ढकलणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात लढा देण्याचा निर्धार करण्याचे आवाहन न्यायाधार संस्थेच्या अध्यक्षा ॲड. निर्मला चौधरी यांनी केले.
क्रांती दिनानिमित्त शुक्रवारी (दि.9 ऑगस्ट) न्यायाधार संस्थेच्या शासनमान्य महिला व बालकांच्या महिला समुपदेशन केंद्राच्या वतीने मुकुंदनगर येथे महिलांसाठी घेण्यात आलेल्या व्याख्यानात ॲड. चौधरी बोलत होत्या. यावेळी कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलच्या अध्यक्षा ॲड. शीजी जॉर्ज, कॉन्व्हेंट स्कूलच्या शिक्षिका रूपाली कदम, न्यायाधार संस्थेच्या समुपदेशन शकुंतला लोखंडे, अर्चना जावळे, ॲड. शुभांगी लांडगे, ॲड. दीक्षा बनसोडे, सुमन काळापहाड, शबाना शेख, गौतमी भिंगारदिवे, अरुणा घोलप, राधा शिंदे, फरजाना शेख, शाहिस्ता शेख, नसरीन शेख, उज्मा शेख, खंदारे मॅडम, राणी सय्यद, सुमय्या शेख आदींसह महिला उपस्थित होत्या.

पुढे ॲड. चौधरी म्हणाल्या की, समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी हायकोर्ट व सुप्रीमकोर्टाचा अभ्यास करून चालत नाही. त्यासाठी समाजात मिसळून ते प्रश्नांची वाचा फोडून ते सोडविण्याचे प्रयत्न करावे लागतात. न्यायाधार संस्थेच्या वतीने 2003 साली समुपदेश सेंटरची स्थापना करण्यात आली. आत्तापर्यंत 5 हजार महिला व पुरुषांचे समुपदेशन करुन त्यांचे सुखी संसार सुरु आहेत. न्यायाधार ही संस्था महिलांनी महिलांसाठी चालवलेली संस्था आहे. विविध क्षेत्रातील व्यक्ती या संस्थेशी जोडले गेलेले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ॲड. शीजी जॉर्ज म्हणाल्या की, महिला कुटुंबाची भूमिका सक्षमपणे पार पाडतात. ज्या कुटुंबामागे व पुरुषामागे महिला खंबीर उभी असते, त्यांची भरभराट होते. महिलांमुळे जग चालते. महिलांसाठी अनेक कायदे अस्तित्वात असून, महिलांनी मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपभोग घ्यावा, मात्र मिळालेले स्वातंत्र्य व काद्याच्या ढालीचा शस्त्र म्हणून वापर करु नये. कायदे महिलांच्या बाजूने असल्याने त्याचे दुरोपयोग टाळावा, अन्यथा संपूर्ण कुटुंबाचे नुकसान होणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. शुभांगी लांडगे यांनी केले. आभार ॲड. दीक्षा बनसोडे यांनी मानले.