जगभरातून आलेल्या कलाकृतीमधून झाली निवड
नगर (प्रतिनिधी)- न्यूयॉर्क येथील आर्ट रिन्यूअल सेंटर हे जगभरातील वास्तववादी कलाकृतीचे स्पर्धा प्रदर्शन दरवर्षी भरवते. यामध्ये राहुरी येथील कलाकार नुरील भोसले यांची कलाकृती अंतिम यादीत आली असून, चंद्रावरतीही संग्रहित करण्यात येणार आहे. व्यक्ती व पशु याचे भावनिक नाते दाखविणारे चित्र त्यांनी रेखांकनातील अतिशय अवघड समजल्या जाणाऱ्या स्टीपलिंग प्रकारात म्हणजे बिंदू देऊन चित्र रेखाटून 44 बाय 35 इंच आकारात दर्जेदारपणे पूर्ण केली आहे. यासाठी त्यांना तब्बल चार वर्षे लागली.
दरवर्षी न्यूयॉर्क येथील आर्ट रिन्यूअल सेंटर या स्पर्धेत विविध विभागात वास्तववादी कला सादर करण्यासाठी जगभरातील मातब्बर कलाकार प्रयत्नांची पराकाष्टा करत असतात. राहुरी (जि. अहिल्यानगर) येथील नुरील प्रभात भोसले यांच्या रेखांकनाला सलग तिसऱ्यांदा हा बहुमान मिळाला आहे. त्यांच्या कलाकृतीची निवड अंतिम यादीत झाली असून, द कॅम्पॅनीयन (सोबती) असे त्यांच्या चित्राचे नाव आहे.

राहुरी येथील मखना (मका) या गोपाळ व्यक्तीची व त्याच्या म्हशीचे (रबडी) चित्र स्टीपलिंग माध्यमात त्यांनी साकारले आहे. रेखांकनातील अतिशय अवघड समजला जाणारा स्टीपलिंग प्रकार म्हणजे विशिष्ट पेनाने कागदावरती जवळजवळ बिंदू देऊन चित्र रेखाटने. चार वर्षाच्या प्रदिर्घ कष्टातून त्यांनी चित्र साकारले आहे.
17 व्या या वर्षीच्या स्पर्धेमध्ये जगभरातून सुमारे 87 देशांच्या 5 हजार कलाकृतींनी अर्ज केला होता. यातील 24 टक्के म्हणजेच 1226 कलाकृतींची निवड करण्यात आली असून, यातील निवडक कलाकृतींचे प्रदर्शन न्यूयॉर्क शहरांमध्ये भरविण्यात येणार आहे. मानवाने निर्माण केलेल्या अजरामर कलाकृती चंद्रावरही जतन केल्या जाव्यात, या प्रकल्पासाठी लुनर (चंद्र) कोडेक्स या प्रणालीने एक विशेष तंत्रज्ञान भौतिक विज्ञानी कला संग्रहकर्ता सॅम्युअल पेराल्टा (कॅनडा) यांच्या अध्यक्षतेखाली विकसित केला आहे. ज्यात जगभरातील सुमारे 157 देशातील 30 हजार अतुलनीय कलाकृती चंद्रावरती डिजिटल स्वरूपात पाठवून संग्रहित ठेवण्यात येणार आहेत. यामाध्ये चित्र, संगीत, फिल्म, कविता, लिखाण यांचा समावेश आहे.
नुरिल भोसले यांच्या द कॅम्पॅनीयन (सोबती) या चित्राची यामध्ये निवड झाली आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुकांचा वर्षाव होत आहे.
