गावाच्या विकास कार्यात सर्वांची साथ मिळत आहे -लताबाई फलके
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) ग्रामपंचायतची मासिक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी निवड झालेले किरण जाधव व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नगर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झालेले ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला.
निमगाव वाघा ग्रामपंचायत व एकता फाऊंडेशनच्या वतीने सरपंच लताबाई फलके आणि फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल फलके यांनी जाधव व डोंगरे यांचा सत्कार केला. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी गोवर्धन राठोड, ग्रामपंचायत सदस्य संजय कापसे, उज्वला कापसे, मुन्नाबी शेख, सुजाता कापसे, गणेश येणारे, दिलीप शेख, दीपक जाधव, नवनाथ फलके, सोमनाथ आतकर आदींसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच लताबाई फलके यांनी गावाच्या विकास कार्यात सर्वांची साथ मिळत आहे. उपसरपंचपदी निवड झालेले किरण जाधव यांची विकासात्मक कार्याला साथ मिळणार आहे. तर डोंगरे यांनी विविध क्षेत्रात योगदान देऊन सामाजिक आणि साहित्य क्षेत्रात चळवळ उभी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना पै. नाना डोंगरे यांनी सामाजिक कार्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांची साथ लाभत आहे. सर्वांना बरोबर घेऊन गावाच्या विकासासाठी आणि युवकांना दिशा देण्यासाठी कार्य केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अतुल फलके यांनी गावातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने एकता फाऊंडेशन सामाजिक कार्य करत असून, युवकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची त्यांनी माहिती दिली.