ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन
सावता महाराजांनी भक्ती व लोकमान्य टिळकांनी देशभक्तीचा मार्ग दाखविला -पै. नाना डोंगरे
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी व लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. निमगाव वाघा ग्रामपंचायत कार्यालयात स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, एकता फाऊंडेशन व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सावता महाराज व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, ग्रामपंचायत अधिकारी प्रविण पानसंबळ, एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा सोसायटीचे संचालक अतुल फलके, रामदास पवार, संदिप गायकवाड, गणेश येणारे, बापू फलके, लक्ष्मण चौरे, दिपक जाधव, भिमाबाई डोंगरे, सुरेश जाधव, गणेश जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे म्हणाले की, कांदा मुळ्यांची शेती फुलवून खरा भक्ती मार्ग दाखविणारे संत सावता महाराजांचे कार्य महान आहे. त्यांनी जीवनात कर्माला महत्त्व दिले. कामातच त्यांनी देव पाहिला. पंढरपूरला ते गेले नाहीत, मात्र त्यांच्या भक्तीने साक्षात पांडुरंग त्यांना भेटावयास आले. कर्तव्य, कर्म करीत राहणे ही एक प्रकारे ईश्वरी सेवा आहे.
तसेच लोकमान्य टिळकांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून स्वातंत्र्य संग्रामात ब्रिटीशांविरोधात समाजाला जागृत करण्याचे कार्य केले. अन्यायाविरोधात जागृती करुन समाजाला दिशा दिली असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत अधिकारी प्रविण पानसंबळ व सोसायटीचे संचालक अतुल फलके यांनी संत सावता महाराजांचा भक्ती मार्ग व लोकमान्य टिळकांनी देशासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला.