ठिय्या देऊन जुगारी कृषिमंत्री हटावच्या जोरदार घोषणा
राज्य सरकार कृषिमंत्रीचा राजीनामा घेत नाही, तो पर्यंत एकप्रकारे सर्व शेतकऱ्यांची अवहेलना सुरु -अनिकेत कराळे
नगर (प्रतिनिधी)- कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करुन ठिय्या देण्यात आला. यावेळी आंदोलकांनी जुगारी कृषिमंत्री हटावच्या जोरदार घोषणा दिल्या.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात शहर जिल्हा कार्याध्यक्ष अनिकेत कराळे, ज्येष्ठ नेते किसनराव लोटके, अशोक बाबर, प्रकाश पोटे, अथर खान, गौरव नरवडे, फरीन शेख, रुकैय्या शेख, अल्तमश जरीवाला, समीर पठाण, सरपंच शरद पवार, फय्याज तांबोली, अनिस शेख, आरिफ पटेल, जावेद शेख आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी यापूर्वी अनेकवेळा वादग्रस्त विधाने केलेली आहेत. शेतकऱ्यांबद्दल अर्वाच्च भाषेत उद्गार काढून त्यांचा अपमान देखील केलेला आहे. पंचनामा करण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश देतानाची अरेरावी, कर्जमाफी वरील वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या विरोधात संतापाची लाट आहे. एका कृषिमंत्रीने शेतकरी वर्गाविषयी अपशब्द वापरणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारे आहे. तर नुकतेच कृषिमंत्री कोकाटे विधान परिषदेत अधिवेश सुरु असताना चक्क मोबाईलवर रम्मीचा जुगार खेळताना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचे भावना दुखावल्या गेल्या असल्याचे म्हंटले आहे.
ते नेहमीच वादग्रस्त वागत असताना राज्याची प्रतिमा मलीन होत आहे. त्यांच्याकडून शेतकरी वर्गाला कोणत्याही प्रकारचे न्याय व आधार मिळू शकणार नसून, पुरोगामी महाराष्ट्रात अशा व्यक्तीच्या ताब्यात कृषिमंत्री पदाची जबाबदारी ठेवणे म्हणजे संपूर्ण शेतकऱ्यांचा अपमान असल्याचे राष्ट्रवादीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करुन कृषिमंत्री कोकाटे यांचा राजीनामा घेण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी करणारे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांना देण्यात आले.
युवा पिढी ऑनलाईन जुगाराच्या आहारी जात असताना, त्यावर तात्काळ राज्य सरकारने बंदी आणण्याची गरज आहे. कृषिमंत्री कोकाटे महाराष्ट्राच्या विधी मंडळ असलेल्या पवित्र सभागृहात चक्क ऑनलाईन जुगार खेळत असतील तर, शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवावी. जो पर्यंत राज्य सरकार त्यांचा राजीनामा घेत नाही, तो पर्यंत एकप्रकारे सर्व शेतकऱ्यांची अवहेलना सरकारने चालवली आहे. -अनिकेत कराळे (शहर जिल्हा कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट)