पावसाळ्यात अंत्यविधीस अडचणी; नव्या शेड व लाईटसाठी विकासनिधीची गरज
आमदार जगताप यांच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लागेल -संजय सपकाळ
नगर (प्रतिनिधी)- भिंगार शहरातील स्मशानभूमीची दुरवस्था लक्षात घेता, नागरिकांना अंत्यविधीसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे स्मशानभूमीच्या विकासासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भिंगार शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्याकडे करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी आमदार संग्राम जगताप यांना दिले. यावेळी जहीर सय्यद, विशाल बेलपवार यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
स्मशानभूमीतील सध्याची परिस्थिती अतिशय खराब असून, पत्र्याचे शेड पूर्णतः जीर्ण झाले आहे. विशेषतः पावसाळ्यात अंत्यविधी करताना व शेडच्या अभावामुळे दुःखद प्रसंगीही अडचणींचा सामना करावा लागतो. याशिवाय, रात्रीच्या वेळेस लाईटची कमतरता असल्याने अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
भिंगार स्मशान भूमीत नव्याने पत्र्याचे शेड उभारावे, लाईटची व्यवस्था करावी तसेच दशक्रिया विधीसाठी बसण्यास बनविलेल्या ओट्याच्यावर शेडची व्यवस्था करावी व स्मशान भूमीच्या इतर विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी भिंगार शहर राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली आहे.
भिंगार मधील अनेक प्रलंबीत विकास कामे आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून मार्गी लागली आहेत. सध्या पावसाळ्यात स्मशान भूमीत अंत्यविधीसाठी अडचण निर्माण होत आहे. आमदार जगताप यांच्या माध्यमातून सदर स्मशान भूमीसाठी भरीव निधी उपलब्ध होवून प्रश्न सुटणार आहे. -संजय सपकाळ (शहराध्यक्ष, भिंगार राष्ट्रवादी)