भाजी विक्रेत्यांसह ग्राहकांना मिळणार सोयी-सुविधा
मार्केटमध्ये सोयी-सुविधा निर्माण करुन देण्याचे असोसिएशनच्या माध्यमातून कार्य सुरु -अंतोन गायकवाड
अहमदनगर (प्रतिनिधी)- नवनागापूर एमआयडीसी हद्दीतील नगर-राहुरी रोड शेजारी नागापूर भाजीपाला मटन मासे व्यापारी असोसिएशन संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केटमध्ये विविध विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा भाजी मार्केटचे संस्थापक अध्यक्ष अंतोन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते विश्वास भाकरे, व्यापारी अनिल गायकवाड, गणीभाई शेख, राहुल आव्हाड, बब्बू शेख, गवळी मामा आदींसह भाजी मार्केटचे सदस्य उपस्थित होते.
अंतोन गायकवाड म्हणाले की, शहरीकरण वाढल्याने एमआयडीसी भागातही मोठ्या प्रमाणात लोकवस्ती झाली आहे. येथील नागरिकांच्या सोयीसाठी अनेक वर्षापासून भाजी मार्केट सुरु आहे. मध्यंतरी नगर-मनमाड रस्त्यालगत भाजी विक्रेते बसत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी व अपघात होत आहे. भाजी मार्केटच्या वतीने पुढाकार घेऊन रस्त्याच्या कडेला स्वच्छता करुन भाजी विक्रेत्यांना जागा उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्यामुळे रस्त्यालगत बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांचा प्रश्न सुटला होता. मात्र मार्केटमध्ये सोयी-सुविधा निर्माण करुन देण्याचे असोसिएशनच्या माध्यमातून कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केटमध्ये पाणी, लाईटची व्यवस्था करुन, संरक्षण व योग्य नियोजनासाठी वॉचमेनची देखील सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. नागरिकांना व्यवस्थित वाहने पार्किंग करुन भाजी बाजार करता येणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.
