गावातील निरक्षर ग्रामस्थांना साक्षरतेचे धडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या नवभारत साक्षरता सप्ताह उपक्रमाचा समारोप निमगाव वाघा (ता. नगर) येथे शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला. यावेळी गावातील निरक्षर ग्रामस्थांना साक्षरतेचे धडे देण्यात आले.
गावातील नवनाथ विद्यालयात पार पडलेल्या समारोपीय कार्यक्रमात साक्षरता वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांनी सशक्त भारताच्या निर्माणासाठी संपूर्ण समाज साक्षर होण्याची गरज आहे. व्यक्ती साक्षर झाल्यास त्याला आपले हक्क, अधिकार व कर्तव्याची जाणीव होते. त्यामुळे समाजाचा विकास साधला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर बुगे यांनी अशिक्षित ग्रामस्थ व स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी सरपंच साहेबराव बोडखे, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, सामाजिक कार्यकर्ते तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, भागचंद जाधव, मुख्याध्यापक भरत कांडेकर, भाऊसाहेब जाधव, संतोष फलके, संजय डोंगरे, प्रमोद थिटे आदी उपस्थित होते.
