जाती-धर्माच्या पलीकडे पीपल्स हेल्पलाइनचा एक नवा सामाजिक प्रयोग
निसर्गधर्म विवाह मेळावे समाजपरिवर्तनाला नवी दिशा देणारे ठरणार -ॲड. कारभारी गवळी
नगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनासाठी व भावी पिढीच्या भवितव्यासाठी पीपल्स हेल्पलाइनच्या वतीने निसर्गधर्म विवाह मेळावा हा अनोखा उपक्रम राबवला जात आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी टप्पा ठरणार आहे. तर युवक-युवतींसाठी सामाजिक समतेचा, स्वावलंबनाचा आणि पर्यावरणाशी नातं जोडणारा एक सशक्त व्यासपीठ ठरणार असल्याची भावना ॲड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केली आहे.
लोकभज्ञाक चळवळीचा हा भाग असून, स्वतंत्र जोडीदार निवडीचा हक्क: कोणताही जाती-धर्माचा अडसर न ठेवता युवक-युवती स्वतःच्या पसंतीनुसार जोडीदार निवडू शकतील. पर्यावरण साक्षी विवाहाचा समावेश करुन पारंपरिक विधीऐवजी, जोडपे झाड लावून, रेन बॅटरी तयार करून आणि निसर्गसंवर्धनाची प्रतिज्ञा घेत विवाहबंधनात अडकतील. मेळाव्यात सहभागी युवक-युवतींसाठी सेंद्रिय शेती, दुग्धव्यवसाय, बागायती, शेळीपालन, व रेन बॅटरी या क्षेत्रांवर मार्गदर्शन दिलं जाणार आहे. सांस्कृतिक सत्रात निसर्गभक्तीवर आधारित गीत, कविता आणि कथा सादर होऊन नवचैतन्याचा प्रसार केला जाणार आहे.
ॲड. कारभारी गवळी म्हणाले की, आज समाजात अनेक तरुण-तरुणी बेरोजगारी, जातीय भेद आणि कौटुंबिक बंधनांमुळे विवाहाच्या प्रतीक्षेत आहेत. निसर्गधर्म विवाह मेळावा ही केवळ एक सोय नाही, तर नवजीवनाची सुरुवात आहे. निसर्गधर्म हीच आपली खरी ओळख आणि जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
हा विवाह मेळावा म्हणजे केवळ वैवाहिक जुळणी नव्हे, तर एक व्यापक समाजपरिवर्तनाची चळवळ आहे. त्यामुळे सर्व युवक-युवती आणि पालक यांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी या ऐतिहासिक उपक्रमात सहभागी व्हावे, आणि एका नवसमाजनिर्मितीचा भाग होण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.