डोंगरे यांचे विविध क्षेत्रातील कार्य प्रेरणादायी -दिलीपराव काटे
अहमदनगर (प्रतिनिधी)- माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने सोसायटीचे सभासद तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. माध्यमिक शिक्षक सोसायटीत चेअरमन दिलीपराव काटे यांच्या हस्ते डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक नेते भाऊसाहेब कचरे, सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन धोंडीबा राक्षे, संचालक धनंजय म्हस्के, काकासाहेब घुले, सोसायटीचे सचिव स्वप्निल इथापे आदी उपस्थित होते.
जय भगवान युवा प्रतिष्ठानच्या वतीने नुकतेच डोंगरे यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. चेअरमन दिलीपराव काटे म्हणाले की, सोसायटीचे सभासद असलेले डोंगरे यांचे विविध क्षेत्रातील कार्य प्रेरणादायी आहे. त्यांचे समाजासाठी निस्वार्थपणे सुरु असलेले कार्य अभिमानास्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सत्काराला उत्तर देताना पै. नाना डोंगरे म्हणाले की, माध्यमिक शिक्षक सोसायटीने वेळोवेळी पाठीवरती कौतुकाची थाप देण्याचे काम केले. सोसायटीने केलेला सन्मान हा आनखी सामाजिक कार्य करण्यास बळ देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
