पुणे येथे रंगला होता आंतर रात्र शालेय क्रीडा महोत्सव
नगर (प्रतिनिधी)- शहरातील भाई सथ्था नाईट हायस्कूलने पुणे येथे झालेल्या आंतर रात्र शालेय क्रीडा महोत्सवात कबड्डी स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविले. तर विविध क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. रात्र शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मासूम संस्थेच्या वतीने नुकतेच क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
रात्रशाळेतील प्रवेशित विद्यार्थी वयाने मोठी असल्याने शालेय स्पर्धेत त्यांना सहभागी होता येत नाही. या विद्यार्थ्यांना विविध क्रीडा स्पर्धेचा आनंद घेता यावा व त्यांच्यातील कौशल्य दाखविण्याच्या उद्देशाने मासूम संस्थेने या स्पर्धेचे आयोजन केले होते. या क्रीडा मेळाव्यात सांघिक मुलांसाठी कबड्डी, मुलींसाठी डॉजबॉल वैयक्तिकमध्ये मुला-मुलींसाठी 100 मीटर, 50 मीटर धावणे या स्पर्धेचा समावेश होता.
या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मासूमचे एनएसटीपी विभागाचे सिनिअर प्रोग्राम हेड संदीप शेलार, प्रोग्राम हेड निलेश ठोंबरे, भाई सथ्था नाईट हायस्कूलचे मुख्याध्यापक व मासूम संस्थेचे सल्लागार समितीचे सदस्य सुनील सुसरे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिक्षक गजेंद्र गाडगीळ, बाळू गोरडे, कैलास करांडे, अशोक शिंदे आदी उपस्थित होते.
कबड्डी स्पर्धेत अटीतटीचे सामने रंगले होते. भाई सथ्था नाईट हायस्कूलचा अंतिम सामना खडकी रात्रप्रशाले बरोबर रंगला होता. यामध्ये काही गुणांनी भाई सथ्था नाईट हायस्कूलला पराभवाचा सामना करुन उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या कबड्डी संघात अक्षय कोतकर (कर्णधार), सागर साळवे (उपकर्णधार) विशाल भोसले, प्रज्वल राजगुरू, आदित्य कुसमुडे, जुनेद पठाण, शहेबाज शेख, कुश कांबळे, धनंजय साठे, भावेश भिंगारदिवे या खेळाडूंचा सहभाग होता.
नाईट हायस्कूलच्या संघाने उपविजेते पद मिळविल्याबद्दल सहभागी विद्यार्थी संघ व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, कार्याध्यक्ष अनंत फडणीस, मानद सचिव संजय जोशी, जेष्ठ मार्गदर्शक ब्रिजलाल सारडा, अजितशेठ बोरा, रात्रशाळेचे चेअरमन डॉ. पारस कोठारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. रात्र शाळेच्या विद्यार्थ्यांना खेळाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी क्रीडा मेळावा आयोजित केल्याबद्दल मासूम संस्थेच्या संचालिका निकिता केतकर, संचालक कमलाकर माने, युवराज बोराडे व मासूम संस्थेची सर्व टीम व स्पर्धेच्या आयोजनासाठी आर्थिक मदत करणाऱ्या बजाज फिन्सर्व या कंपनीचे सल्लागार सदस्य सुनील सुसरे यांनी आभार मानले.