स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून काम सुरु करण्याची मागणी; अंत्यविधीसाठी करावा लागतो अनेक अडचणींचा सामना
अन्यथा यापुढील सर्व अंत्यविधी ग्रामपंचायत कार्यालया समोरील सभामंडपात होणार -जालिंदर बोरुडे
नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नागरदेवळे गावची स्मशानभूमी सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अंत्यविधी करणे ग्रामस्थांसाठी मोठ्या अडचणीचे ठरत आहे. या प्रश्नावर लक्ष वेधत स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतने तातडीने निधी उपलब्ध करून दुरुस्तीचे काम सुरु करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे व ग्रामस्थांनी केली आहे. 15 दिवसांत काम पूर्ण झाले नाही, तर येथून पुढे सर्व अंत्यविधी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील सभामंडपात होतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
नागरदेवळे येथील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी असलेला पत्र्याचा शेड पूर्णतः जीर्ण झाला आहे. त्याला जागोजागी खड्डे पडले असून, पावसात त्या ठिकाणी अंतिम संस्कार करणे अशक्य झाले आहे. पावसाच्या दरम्यान एखादा अंत्यविधी करावयचा असल्यास पाऊस संपेपर्यंत ती अंत्ययात्रा ग्रामपंचायत समोरील सभा मंडपात थांबवावी लागते, मग पाऊस बंद झाल्यानंतर अंत्यविधीची प्रक्रिया करावी लागत आहे. मागील दोन वर्षापासून हा प्रश्न प्रलंबीत असून, तो अधिकच बिकट बनत चालला आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद, ग्रामपंचायत कार्यालयाकडे पाठपुरावा करुनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही.
याशिवाय, स्मशानभूमीत बसण्याची कोणतीही व्यवस्था नाही. नागरिकांना उभ्याच राहून अंत्यसंस्काराला थांबावे लागते. रात्रीच्या वेळी लाईट नसल्यामुळे आणखी अडचणी निर्माण होतात. अशा दुःखद प्रसंगात लोकांना सुविधा नसल्यामुळे मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
नव्याने पत्र्याचे मजबूत व पावसापासून संरक्षण करणारे शेड उभारावे, लाईटची योग्य व्यवस्था करण्यात यावी, दशक्रिया विधीसाठी ओटे व त्यावर शेडची व्यवस्था करावी, स्मशानभूमीला गेट उभारावे व परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवावे, अंत्यविधी आणि दशक्रिया करताना पाण्याची सोय उपलब्ध करावी, संपूर्ण परिसराची स्वच्छता व नियमित देखभाल करण्यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी सागर खरपुडे हे देखील सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
ग्रामस्थांना जेथे गरज आहे, तेथे विकास कामे मार्गी लावण्याची गरज आहे. स्मशानभूमीची दुरावस्था अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेला असताना बाकीचे कामे बाजूला ठेऊन हे काम मार्गी लावावे. शेवटच्या दु:खद प्रसंगात नागरिकांना यातना सहन कराव्या लागत असून, ही मोठी शोकांतिका आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने येत्या 15 दिवसात सदरचे काम मार्गी लावावे. अन्यथा यापुढील सर्व अंत्यविधी ग्रामपंचायत कार्यालया समोरील सभामंडपात केले जाणार आहे. -जालिंदर बोरुडे (सामाजिक कार्यकर्ते)