शिक्षण, आरोग्य आणि ओळखीचा हक्क कचरावेचकांना मिळणार; सरकारकडून थेट लाभ
महागाईच्या काळात कचरावेचकांची परिस्थिती अत्यंत गंभीर -विकास उडाणशिवे
नगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारच्या नमस्ते योजना अंतर्गत कचरा वेचकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अहिल्यानगर महापालिकेत या योजनेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. कागद, काच पत्रा कष्टकरी पंचायत, अहिल्यानगर यांच्या वतीने आयोजित बैठकीत उपायुक्त संतोष टेंगळे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापक अशोक साबळे, पुणे येथील कष्टकरी पंचायतच्या वैशाली उषा अशोक, स्वाती पाटील, कविता मैत्री, चंचल कोष्टी, तसेच अहिल्यानगर जिल्हा समन्वयक विकास उडाणशिवे उपस्थित होते. कचरा वेचक प्रतिनिधी लंकाबाई शिंदे, कमल खुडे, विठाबाई साबळे, नंदाबाई सोनवणे व रामवाडी तसेच शहरातील कचरा वेचक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
वैशाली अशोक म्हणाल्या की, केंद्र सरकारच्या नमस्ते योजनेतून कचरा वेचकांची अधिकृत नोंदणी केली जाणार आहे. या नोंदणीद्वारे त्यांना ओळखपत्र मिळणार असून, त्यांच्या कामाला अधिकृत मान्यता मिळणार आहे. नोंदणीकृत कचरा वेचकांना आयुष्मान भारत आरोग्य विमा योजनेचा लाभ, त्यांच्या इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांना 3,500 रुपयांची शिष्यवृत्ती, तसेच त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक किट्स मिळणार आहेत. त्यानुसार सर्व कचरा वेचकांनी तातडीने नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
विकास उडाणशिवे यांनी कचरावेचकांच्या अत्यंत कठीण जीवनस्थितीवर प्रकाश टाकताना सांगितले की, कचरावेचकांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. महागाईच्या काळात कचरा वेचून मिळणारी रक्कम अतिशय तटपुंजी आहे. कचरा वेचक समाजात स्वच्छतेसाठी मोठा हातभार लावत आहे. त्यांच्या कामाची पत वाढली पाहिजे. त्यांना जीवन जगण्या योग्य किंमत मिळाली पाहिजे. या दृष्टिकोनातून शासनाने एक वेगळी योजना राबवण्याची गरज आहे. मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन गरजा भागवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागत आहे. नमस्ते योजनेच्या माध्यमातून कचरा वेचकांच्या मुलांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमुळे मोठा आधार झाला आहे. आरोग्याबद्दल देखील सहकार्य मिळाले असल्याची भावना व्यक्त केली.
उपायुक्त संतोष टेंगळे यांनी कचरा वेचक हे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी योगदान देत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन केंद्र शासनाने नमस्ते योजनाच्या माध्यमातून त्यांना शासकीय योजनांच्या प्रवाहात आणले आहे, ही अत्यंत स्वागतार्ह बाब असून, याचा कचरा वेचकांनी लाभ घेण्याचे त्यांनी स्पष्ट केले.