खासदार लंके यांचा उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने होणार गौरव
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त 14 मे रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी खासदार निलेश लंके यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे संयोजक पै. नाना डोंगरे यांनी खासदार लंके यांना स्वागत अध्यक्षपदाच्या जबाबदारीचे पत्र दिले.
स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, राज्यभरातील ज्येष्ठ साहित्यिक व कवी या सोहळ्यास उपस्थित राहणार आहे. छत्रपती संभाजी महाराज हे स्वयं उत्कृष्ट साहित्यिक होते. त्यांनी विविध भाषांचे सखोल अध्ययन केले होते तसेच अभ्यासपूर्ण ग्रंथनिर्मितीही केली होती. त्यांच्या कार्यातून नवोदित साहित्यिकांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पै. नाना डोंगरे यांनी दिली.
सर्वसामान्यांचे व शेतकरी वर्गाचे संसदेत प्रश्न मांडून ते सोडविण्यासाठी सातत्याने पुढाकार घेणारे खासदार लंके यांना या संमेलनात उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी गावातून छत्रपती संभाजी महाराजांच्या साहित्यावर आधारित ग्रंथ दिंडी काढली जाणार आहे. यानंतर परिवार मंगल कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते संमेलनाचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत यांचे परिसंवाद आणि व्याख्याने होणार आहेत. मध्य सत्रात कवी संमेलन रंगणार असून, वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना पुरस्कार देवून सन्मानित केले जाणार आहे.