कार्यक्रम सोहळा दिमाखदार होण्यासाठी केल्या सूचना
नगर (प्रतिनिधी)- शहरातील माळीवाडा वेस येथे उभारण्यात येणाऱ्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या एकत्रित पुतळा उभारणीसाठी चौथऱ्याचे व सुशोभीकरणाचे भूमिपूजन रविवारी (दि.27 जुलै) राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. अजित पवार यांच्या हस्ते व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी आमदार संग्राम जगताप यांनी माळीवाडा येथील कार्यक्रम स्थळाची पहाणी केली.
आमदार जगताप यांनी रविवारी होणाऱ्या भूमिपूजनचा कार्यक्रम सोहळा दिमाखदार होण्यासाठी महापालिका अधिकारी व महात्मा फुले व सावित्रीबाई फुले कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. तर सर्व समाज बांधवांना कार्यक्रमास सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी मनपा आयुक्त यशवंत डांगे, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले कृती समितीचे अध्यक्ष प्रा. माणिक विधाते, सकल माळी समाजाचे अध्यक्ष किशोर डागवाले, उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, कृती समितीचे सचिव अशोक कानडे, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, ज्ञानेश्वर रासकर, श्री विशाल गणेश देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, फुले ब्रिगेडचे दीपक खेडकर, भरत गारुडकर, मळू गाडळकर, राहुल रासकर, राहुल बोरुडे, विष्णुपंत म्हस्के, जल अभियंता परिमल निकम, शहर अभियंता मनोज पारखे, उप अभियंता श्रीकांत निंबाळकर, अशोक गायकवाड, सुरेश बनसोडे, अमित काळे, मनिष साठे, अजय साळवे आदी उपस्थित होते.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, रविवारी सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा एकत्रित पूर्णाकृती पुतळा उभारणीसाठी आमदार संग्राम जगताप यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. ही वास्तविक स्व. अरुणकाका जगताप यांची संकल्पना होती. 13 नोव्हेंबर 2022 पासून याबाबत पाठपुरावा सुरु होता. या कामाला मूर्त स्वरुप येत आहे. हा पुतळा सर्व समाजाला प्रेरणा देण्याच्या उद्देशाने उभा राहत आहे. या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे त्यांनी सांगितले.