• Wed. Oct 15th, 2025

अहिल्यानगर मध्ये एमआयडीसीचा 63 वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा

ByMirror

Aug 2, 2025

एमआयडीसी व कृष्णाली फाऊंडेशनचा उपक्रम; रक्तदान, वृक्षारोपण आणि गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान


वृक्षारोपण व रक्तदानासारख्या उपक्रमांतून समाजप्रती आपली बांधिलकी सिद्ध होते -गणेश राठोड

नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा (एमआयडीसी) 63 वा वर्धापन दिन नगरमधील अहिल्यानगर एमआयडीसीमध्ये विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. अहिल्यानगर एमआयडीसी व कृष्णाली फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, तसेच विविध स्पर्धांच्या विजेत्यांचा सन्मान यासारखे विधायक उपक्रम राबविण्यात आले.


या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल 63 नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. हे शिबिर साई सेवा ब्लड बँक यांच्या सहकार्याने पार पडले. रक्तदात्यांचा विशेष सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला. त्याचबरोबर एमआयडीसी अग्निशामक विभागाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमात एमआयडीसीमधील कामगारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच एमआयडीसीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना माऊली सभागृहात रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमामुळे एमआयडीसी परिसरात एक कौटुंबिक सोहळा रंगला होता.


एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी गणेश राठोड म्हणाले की, एमआयडीसीच्या प्रगतीसाठी आपले सातत्याने प्रयत्न सुरू असतात, परंतु सध्या झपाट्याने होत असलेली वृक्षतोड ही चिंतेची बाब आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. तसेच रक्तदानासारख्या उपक्रमांतून समाजप्रती आपली बांधिलकी सिद्ध होत असल्याचे स्पष्ट केले. तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर राज्यात समतोल औद्योगिक विकास साधण्यासाठी 1 ऑगस्ट 1962 रोजी एमआयडीसीची स्थापना करण्यात आली. तब्बल 63 वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये औद्योगिकीकरणाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, स्थानिक विकास व आर्थिक वाढ साधणाऱ्या एमआयडीसीचा वर्धापन दिन प्रत्येक जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा होत असल्याची माहिती त्यांनी दिली.


उपअभियंता सरदार अनुसे म्हणाले की, उद्योजक व कामगारांनी सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग घेतल्यास एक मोठी चळवळ उभी राहू शकते. अशा चळवळीतून एमआयडीसीतील विविध प्रश्‍न सोडविण्यास मदत होणार आहे. एमआयडीसी टिकली, तर उद्योग टिकतील आणि कामगारांचे हितही सुरक्षित राहील.


कृष्णाली फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत पाटील शेळके यांनी एमआयडीसी ही कोणत्याही शहराची खरी कामधेनू आहे. तिच्या अस्तित्वामुळे त्या शहराचा विकास व आर्थिक समृद्धी शक्य होते. एमआयडीसीच्या सामाजिक उपक्रमांमध्ये फाउंडेशनचा नेहमीच सक्रिय सहभाग राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या कार्यक्रमाला क्षेत्र व्यवस्थापक दिलीप काकडे, अग्निशामक अधिकारी जगजितसिंग जाट, आमीचे अध्यक्ष जी.एस. खकाळ, महेश इंदानी, श्रीहरी टिपूगडे, प्रियंका पाटील शेळके, पवन सदाफळे, अजित जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृष्णाली फाऊंडेशन आणि साई सेवा ब्लड बँकेचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *