सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी रविवारच्या कार्यक्रमात वकीलांनी सहभागी व्हावे -ॲड. कारभारी गवळी
नगर (प्रतिनिधी)- भारतीय संविधानाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या द्विशताब्दी महोत्सव साजरा होत आहे. शहरात रविवारी 6 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाचे दोन न्यायमूर्ती वकिलांना उन्नत चेतनेचे धडे देण्यासाठी आवर्जून येत आहे. जिल्ह्यातील वकिलांनी या सुवर्णसंधीचा फायदा घेतला पाहिजे. या कार्यक्रमात आपापसातील वाद बाजूला ठेऊन न्यायमूर्तींचा सन्मान म्हणून या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी केले आहे.
न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांनी रामशास्त्री प्रभुणे यांचा बाणा सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून राबविला आहे. सध्या कलकत्ता आणि अलाहाबाद हायकोर्टाच्या वकील संघटनेचा बहिष्कार सुरू आहे. नगरच्या वकिलांनी असा बहिष्कार टाकण्याचा ठराव करण्याअगोदर आपल्या ठरावामुळे दोन निष्पृह न्यायमूर्तीवर आपण अन्याय करत आहोत, ही बाब लक्षात घेतली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तीच्या कार्यक्रमावर जाहीर रीतीने बहिष्कारचा ठराव म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाचा एकप्रकारे अवमान तर आहेच, परंतु त्याचबरोबर दोन उच्च न्यायमूर्तींवर हा दिवसा ढवळ्या अन्याय आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वकिलांनी नगर-दौंड रोड येथील बडीसाजन कार्यालयात रविवारी होणाऱ्या कार्यक्रमात न्यायमूर्तींना ऐकण्यासाठी आवर्जून उपस्थित राहण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
न्यायालय हे तमस चेतनेचा नाश करून उन्नत चेतनेची स्थापना करण्यासाठी निर्माण करण्यात आलेले आहे. वकिलांमधून न्यायधीशांच्या नेमणुका होतात, त्यामुळे वकिलांनी फुटकळ नळावरचे भांडण सोडून, पुन्हा चेतनेच्या दिशेने प्रगती केली पाहिजे. 200 वर्ष नगरच्या न्यायालयाला झाली. यातून सध्याचा वकील हा 200 वर्षांपूर्वीच्या वकिलांच्या खांद्यावर उभा आहे आणि सध्याच्या वकिलांचा शहाणपणा व त्यांची उन्नत चेतना ही संपूर्ण समाजाला मार्गदर्शक ठरली पाहिजे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात वकिलांची भागीदारी मोठी आहे. त्यामुळे स्वातंत्र्याला 75 वर्षे होऊन गेली आणि लक्षावधी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपला अभ्यास आणि आपली उन्नत चेतना विकसित करण्यासाठी वकिलांचा प्रयत्न राहिला पाहिजे. ते जर होणार नसेल त्यातून समाजाला चुकीचा संदेश जातो याची जाण प्रत्येकाने ठेवली पाहिजे आणि आत्मपरीक्षण करण्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे.
विशेष गोष्ट म्हणजे हा कार्यक्रम कोणी आयोजित केला, यापेक्षा वकिलांना उन्नत चेतनाच्या मार्गावर नेणारे दोन न्यायाधीश आवर्जून येतात, यातच नगर जिल्ह्यातील वकिलांचा सन्मान आहे. त्यामुळे ॲड. कारभारी गवळी यांनी वकिलांनी सोनं सोडून घ्या आणि चिंधी फेकून द्यावी!, सध्याचे वाद फुटकळ आहे, परंतु उद्या उन्नत चेतनच्या जवळ जाण्याची संधी पुन्हा परत येणार नसल्याचेही म्हंटले आहे.