श्रमिक, कष्टकरी कामगार वर्गाला न्याय-हक्कासाठी एकजुटीने संघर्ष करण्याचे आवाहन
प्रश्न सोडविण्यासाठी सर्वसामान्यातून नेतृत्व निर्माण करावे लागेल -सुनील ओहोळ
नगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सामाजिक एकतेचा संदेश देऊन सर्व श्रमिक, कष्टकरी कामगार वर्गाला न्याय-हक्कासाठी एकजुटीने संघर्ष करण्याचे आवाहन करण्यात आले. तर केंद्र सरकारकला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली.
सिध्दार्थनगर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ, जिल्हा महासचिव मेजर राजू शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख, शहर अध्यक्ष फिरोज शेख पत्रेवाला, विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब काते, भाईचारा कमिटी अध्यक्ष उमा शंकर यादव, सलीमभाई अत्तर, बाळासाहेब मधे, रवी नंदकुमार, गणेश बागल, संतोष मोरे, दत्तू गिरी, अनिल पवार, मच्छिंद्र हिरे, बाळासाहेब गायकवाड, ज्योती मधे, मनीषा जाधव, श्याम आवटी, तन्मय मोरे, मयूर शिंदे, संजय जगताप, बंटी आरगडे, कचरू लष्करे, बापूसाहेब उल्हारे आदी उपस्थित होते.
सुनील ओहोळ म्हणाले की, ये आझादी झूटी है, देश की जनता भूकी है! हे अण्णाभाऊ साठे यांचे वाक्य वास्तव म्हणून पुढे येत आहे. तीच परिस्थिती आज देशात व राज्यात आहे. सर्वसामान्य नागरिक व कामगार वर्गावर उपासमारीची वेळ आलेली आहे. सरकार विकासावर बोलत नाही, मात्र त्यांना जातीचे व धर्माचे मुद्दे अधिक महत्त्वाचे वाटत आहे. विधिमंडळात भूमिहीन, शेतकरी, उपेक्षित, आरोग्य व शिक्षणाचे प्रश्न मांडले जात नाही. तर वैयक्तिक हेवेदावे, राजकारण व धार्मिक मुद्द्यांवर सभागृहात वादंग निर्माण केले जाते. यातून मुळ मुद्द्यांना बगल दिली जाते. प्रश्न सोडविण्यासाठी सर्वसामान्यातून नेतृत्व निर्माण करावे लागणार आहे. समाजाने देखील एकत्र येऊन स्वतःचा विकास साधण्याची गरज आहे. हेच खरे अभिवादन अण्णाभाऊ साठे यांना ठरणार असल्याचे स्पष्ट केले. तर बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून सर्वसामान्यांकडे नेतृत्व दिले जात असल्याचे ते म्हणाले.