ग्रामस्थ आणि शाळा समितीच्या वतीने शिक्षकांचाही गौरव
विद्यार्थी घडविणारी शाळा गावचा अभिमान आहे -बाबासाहेब शिंदे
नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ (ता. पारनेर) येथील तरटीफाटा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांना घडविणाऱ्या शिक्षकांचा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध शिष्यवृत्ती परीक्षा, कला-क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजय खोडदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणतज्ज्ञ व माजी सरपंच बाबासाहेब शिंदे, मारुती रोकडे, मच्छिंद्र रोकडे, मुक्ताजी साळुंके, भास्कर साळुंके, माजी मुख्याध्यापक कृष्णराव झावरे सर, माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रावसाहेब जाधव, किरण साळुंके, गुलाब रोकडे, मनिषा रोकडे आदींसह ग्रामस्थ, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.
कार्यक्रमात मंथन शिष्यवृत्ती परीक्षा, लिप फॉर वर्ल्ड इंग्लिश प्रोग्राम, मिशन आरंभ शिष्यवृत्ती पूर्वपरीक्षा आणि तालुकास्तरीय कला-क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पारनेर तालुकास्तरावर चित्रकला स्पर्धेत बालगटात प्रथम क्रमांक मिळवलेल्या कु. अन्वयी रोकडे हिचा विशेष सत्कार करण्यात आला.
या यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक विशाल पाचारणे सर आणि मुख्याध्यापक विश्वासराव नेव्हे सर यांचाही ग्रामस्थांनी विशेष गौरव केला.
बाबासाहेब शिंदे म्हणाले की, हीच शाळा माझा मुलगा एमबीबीएस डॉक्टर होण्यासाठी आधारभूत ठरली. या शाळेला उज्ज्वल यशाची परंपरा लाभली आहे. येथे शिक्षक तळमळीने काम करत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत आहे. त्यामुळे ही शाळा आज गावाचा खरा अभिमान आहे. शासकीय शाळांनी सध्या सीबीएसई पॅटर्न स्वीकारल्यामुळे स्पर्धेच्या युगात त्या विद्यार्थ्यांना नवी दिशा देवू लागल्या आहेत. शिक्षणाच्या दर्जामध्ये वाढ होत असून, ही बाब अत्यंत भूषणावह असल्याचे त्यांनी सांगितले. गुणवंतांचा गौरव करताना उपस्थितांनी एकमुखाने शाळेच्या प्रगतीसाठी सहकार्याची ग्वाही दिली.