• Fri. Jan 30th, 2026

दहावीत 95 टक्कयांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव

ByMirror

Oct 8, 2024

तर राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

अहमदनगर जिल्हा मराठा समाज सेवा मंडळ होतकरु व गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठिशी -अनिल शिंदे


अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा समाज सेवा मंडळ समाजातील होतकरु व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या पाठिशी उभे आहे. आजचे विद्यार्थी भविष्यातील समाजाचे व देशाचे भवितव्य असून, त्यांना दिशा देण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. पुढचे वर्षी 90 टक्क्यांचा निकष लावून व कला, क्रीडा क्षेत्रातील समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सन्मान सोहळा आयोजन करण्याचा मानस संस्थेचे सचिव अनिल शिंदे यांनी व्यक्त केला.


अहमदनगर जिल्हा मराठा समाज सेवा मंडळाच्या वतीने सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत 95 टक्कयांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्याप्रसंगी शिंदे बोलत होते. रेसिडेन्शियल हायस्कूलचे प्राचार्य विजयकुमार पोकळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब गिरवले, रमाकांत गाडे, सहसचिव बाळकृष्ण काळे, खजिनदार विनायक गरड, संचालक बाळासाहेब जगताप, आसाराम कावरे, क्रीडा शिक्षक सुधाकर सुंबे, प्रा. रंगनाथ सुंबे आदींसह पालक व गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते.


प्रारंभी राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे प्रारंभ करण्यात आले. प्रास्ताविकात सहसचिव बाळकृष्ण काळे यांनी संस्थेची अर्धशतकाकडे वाटचाल सुरू असून, समाजाला दिशा व आधार देण्याच्या उद्देशाने या सेवा मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. फक्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यापुरते संस्थेचे काम मर्यादीत नसून, विद्यार्थ्यांच्या पाठीशी संस्था नेहमीच उभी राहणार असल्याचे सांगितले.


बाळासाहेब जगताप यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यास गुणवंत विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार असून, प्रत्येक क्षेत्रात समाजाची मुले पुढे जाणार असल्याचे सांगितले. सुधाकर सुंबे यांनी दहावीच्या गुणांनी हुरळून जाऊ नका, नीट-सेट व स्पर्धा परीक्षांचे ध्येय ठेऊन तयारीला लागण्याचे आवाहन केले. प्रा. रंगनाथ सुंबे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, मात्र विद्यार्थी या मराठी विषयाकडे दुर्लक्ष करत असून, एमपीएससी मध्ये 100 गुणांचा पेपर मराठीचा असल्याची माहिती त्यांनी दिली.

अभिषेक कळमकर म्हणाले की, संस्थेचे सदस्य विविध राजकीय पक्षात काम करताना समाजकारणामध्ये राजकारण आणत नाही. विद्यार्थ्यांनी ध्येय ठरवून लक्ष विचलित होऊ न देता वाटचाल करावी. दोन ते तीन वर्ष स्वतःला झोकून देऊन ध्येय साध्य करण्याचे त्यांनी आवाहन केले.


प्राचार्य विजयकुमार पोकळे म्हणाले की, शिक्षण, क्रीडा क्षेत्रात मुली आघाडीवर आहेत. समाजात मुलींचे महत्त्व वाढले आहे. मुला-मुलींनी आपल्या आवडीनुसार करियर निवडावे. परमेश्‍वराने प्रत्येकाला वेगवेगळी गुण-वैशिष्ट्ये दिलेली आहे. आपल्यातील कला-गुण ओळखून त्या दिशेने वाटचाल करावी. पालकांनी मुलांची तुलना इतर मुलांशी करू नका, त्यांच्यातील विशेष बाब ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी करावे असे सांगितले. तर कोणत्याही कामाची लाज बाळगू नका, हा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.


संस्थेचे अध्यक्ष दादाभाऊ कळमकर, उपाध्यक्ष बापूसाहेब डोके, सहसचिव जयंत वाघ, संचालक शरद ठाणगे, गणपतराव तोडमल यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या गुणगौरव सोहळ्यात दहावीत 95 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या श्रावणी चिताळ, पूजा घोडके, वैष्णवी टकले, पूर्वा ढोरस्कर, नक्षत्रा ढोरस्कर, प्रियंका भगत, दिव्या कराळे, श्रावणी शिंदे, सिध्दांत लगड, गौरी बोरुडे, समृध्दी कराळे, नक्षत्रा शिंदे, लक्ष्मी लोखंडे, तसेच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील गुणवंत खेळाडू विश्‍वेषा मिस्कीन, साक्षी मोरे, शिवम सुंबे, कृष्णा दळवी, पूजा लगड, ज्ञानेश्‍वरी कार्ले या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व आर्थिक बक्षिसाच्या धनादेशाने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार आसाराम कावरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *