दिव्यांगांसाठी शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि मार्गदर्शनाचे केंद्र ठरणार प्रभावी
नगर (प्रतिनिधी)- शहरातील मतिमंद विकास शिक्षण मंडळ संचलित ज्योत्स्ना उद्योग केंद्र सोसायटी कार्यशाळेत मनो न्याय आणि बालस्नेही संघाची स्थापना करण्यात आली. ही स्थापना राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या 2024 च्या निर्देशानुसार करण्यात आली असून, मनोरुग्ण आणि बौद्धिक दृष्ट्या दिव्यांग व्यक्तींना न्याय व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

या संघाच्या माध्यमातून दिव्यांग मुलांना विविध शासकीय सेवा, सुविधा, घरकुल योजना आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती, मार्गदर्शन आणि अंमलबजावणी करण्यात येणार आहे. संघ स्थापनेच्या प्रसंगी ॲड. राजाभाऊ शिर्के, ॲड. भक्ती शिरसाठ, ॲड. आशा गोंधळी, इथापे, ॲड. ज्ञानेश्वर दाते, प्रभाकर धिरडे, अल्लाउद्दीन शेख यांच्यासह विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य, दिव्यांग विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात ॲड. राजाभाऊ शिर्के यांनी दिव्यांगांसाठी अस्तित्वात असलेल्या कायद्यांविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या हक्कांची जाणीव होणे आणि त्याचे संरक्षण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. समाजाने या घटकाला समजून घेऊन त्यांच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात योगेश आल्हाट यांनी या संघाच्या स्थापनेमागचा उद्देश स्पष्ट करत दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या हक्कांसाठी सक्षम करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. उपस्थित पालकांपैकी जोतीराम फरतडे, नारायणे, रणजीत गांधी यांनी योजनांबाबत आपल्या शंका मांडल्या. त्यांना संबंधित तज्ज्ञांनी समर्पक उत्तरे देत अडचणींचे निरसन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशीला जाधव यांनी केले. आभार भाऊसाहेब कदम यांनी मानले. उपस्थितांच्या सहभागातून दिव्यांगांसाठी समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी या उपक्रमाचे महत्त्व कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात आले.