• Wed. Oct 15th, 2025

लहुजी शक्ती सेनेच्या ज्येष्ठ व माजी पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे

ByMirror

Jul 28, 2025

नवीन पदाधिकारी निवडताना विश्‍वासात घेतले जात नसल्याचा आरोप


मेळावा घेऊन स्वतंत्र भूमिकेचा निर्णय घेणार -सुनील शिंदे

नगर (प्रतिनिधी)- नवीन पदाधिकारी निवडताना ज्येष्ठ व माजी पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात घेतले जात नसल्याचा आरोप करुन लहुजी शक्ती सेनेच्या ज्येष्ठ व माजी जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी सामुहिक राजीनामे दिले. नुकतीच लहुजी शक्ती सेनेच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृह येथे बैठक पार पडली. यावेळी सर्व माजी पदाधिकाऱ्यांनी राज्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्‍वर जगधने यांच्याकडे राजीनामे सुपुर्द केले. अनेक वर्षापासून संघटनेचे प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना डावलून नवीन कार्यकर्त्यांना पदे देण्याचे काम सुरु असल्याचा आरोप उपस्थितांनी केला.


लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे व प्रभारी प्रदेशाध्यक्ष कैलास खंडारे यांच्या उपस्थितीमध्ये काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये संघटनेची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करुन नवीन पदाधिकारी निवडण्याचे सूचविण्यात आले होते. मात्र नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जुने व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात घेऊन होत नसल्याने नाराज झालेल्या पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचे अस्त्र उगारले आहे.


जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, युवा जिल्हाध्यक्ष आप्पा रोकडे, कर्जत तालुका अध्यक्ष लक्ष्मण निक्षे, पाथर्डी तालुका अध्यक्ष सिताराम शिरसाठ, नेवासा तालुका अध्यक्ष किरण कणगरे, पारनेर तालुका अध्यक्ष कृष्णा शेलार, अहिल्यानगर शहराध्यक्ष संतोष उमाप, जिल्हा कार्याध्यक्ष राजाराम काळे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष नवनाथ शिंदे, पारनेर महिला तालुकाध्यक्षा राणी उमाप, कर्जत महिला तालुकाध्यक्षा सुनीता भवाळ, श्रीगोंदा कार्याध्यक्ष बाळासाहेब बुलाखे, रामदास मोरे, वसंत औचिते, प्रवीण शेंडगे, संतोष शेंडगे, मधुकर सकट, पुष्पा शेंडगे, दत्ताभाऊ शिंदे, तेजस अवचर, लखन साळवे यांनी संघटनेच्या सदस्यपदाचे राजीनामे दिले.


जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे म्हणाले की, माजी व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात घेऊन नवीन पदाधिकाऱ्यांची निवड होणे अपेक्षित आहे. मात्र ज्यांनी संघटना वाढविण्यासाठी अहोरात्र काम केले त्यांना डावलून नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या परस्पर होत असेल, तर ते चूकीचे आहे. संघटनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी या भावना लक्षात न घेतल्यास समाजाचा मेळावा घेऊन इतर संघटनेत जायचे की, स्वतंत्र संघटना निर्माण करायची याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.


युवा जिल्हाध्यक्ष आप्पा रोकडे म्हणाले की, ज्येष्ठ व माजी पदाधिकाऱ्यांनी गावागावात जाऊन जिल्ह्यात संघटना वाढविण्याचे काम केले आहे. या पदाधिकाऱ्यांच्या भावना समजावून न घेतल्यास वेगळ्या माध्यमातून जावे लागणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. राज्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्‍वर जगधने यांनी राजीनामे दिलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचविणार असून, माजी पदाधिकाऱ्यांवर अन्याय होत असताना यातून सकारात्मक मार्ग काढला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *