• Sat. Aug 30th, 2025

लग्नाळू युवकाची फसवणुक; सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन पत्नी फरार

ByMirror

Aug 16, 2025

पीडित पतीची टोळीचा पर्दाफाश करण्याची मागणी; कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा

नगर (प्रतिनिधी)- लग्न करून काही दिवस संसार थाटल्यानंतर घरातील सोन्याचे दागिने आणि लाखो रुपयांची रोख रक्कम घेऊन फरार होणाऱ्या शहरातील टोळीचा पर्दाफाश करण्याची मागणी पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथील अनिल गायकवाड यांनी तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणात पीडित पतीने स्वतःला खोट्या लग्नाच्या जाळ्यात अडकवून आर्थिक लूट झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.


गायकवाड यांची ओळख नगर रेल्वे स्टेशन रोड येथे राहणाऱ्या एका महिलेशी झाली होती. सदर महिलेने आपल्या मुलीसाठी योग्य स्थळ शोधत असल्याची माहिती दिली. काही दिवसांतच तिने गायकवाड यांना मुलीशी लग्न करण्यासाठी गळ घातली. अविवाहित असलेल्या गायकवाड यांनी तिच्यावर विश्‍वास ठेवून होकार दिला आणि 24 जुलै 2025 रोजी आळंदी देवाची (ता. खेड, जि. पुणे) येथे विवाह केला.


लग्नानंतर पत्नी बोल्हेगाव येथील घरी नांदण्यास आली. सुरुवातीच्या दहा-पंधरा दिवसांत संसार सुरळीत चालला. मात्र, 6 ऑगस्ट रोजी मध्यरात्री पत्नी आणि तिची आई घरात मुक्कामी असताना कपाटातील बॅग उघडून 7 तोळे सोन्याचे दागिने, चार चांदीच्या अंगठ्या आणि 4 लाख 30 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे.


दुसऱ्या दिवशी 7 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता कोतवाली पोलिसांकडून त्यांना फोन आला की, तुमच्याविरुद्ध तक्रार आली आहे, हजर व्हा. पोलिस ठाण्यात गेल्यावर पत्नी, तिची आई आणि 20-25 गुंड प्रवृत्तीचे लोक तिथे उपस्थित होते. पोलिसांसमोर कागदपत्रांवर जबरदस्तीने सह्या घेतल्याचा आणि नंतर घरी जाण्यास सांगितल्याचा आरोप त्यांनी केला.


या घटनेनंतर गायकवाड यांना कळाले की, सदर महिलेचे माझ्याशी लग्न करण्यापूर्वी तीन विवाह झालेले आहेत. अशा प्रकारे लग्नाळू मुलांना फसवून त्यांची लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.


या फसवणूक प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा गायकवाड यांनी दिला आहे. या प्रकरणामुळे शहरात लग्नाच्या आमिषाने होणाऱ्या आर्थिक फसवणुकीच्या घटना आणि अशा टोळ्यांच्या वाढत्या धाडसाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *