मराठा समन्वय परिषदेची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाला 50 टक्केच्या आत ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी मराठा समन्वय परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. परिषदेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना या मागणीचे निवेदन दिले.
यावेळी मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्ष अनिता काळे, सविता देशमुख, मीरा बेरड, मीनाक्षी जाधव, प्रतिभा भिसे, प्राजक्ता गुंजाळ, सारिका अकोलकर, संगीता गरड आदी उपस्थित होत्या.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटी (ता.अंबड जि. जालना) याठिकाणी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवून आंदोलकांवर पोलीसांनी केलेल्या अमानुष लाठीमारचा मराठा समन्वय परिषदेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. सरकारने मराठा समाजाचा संयम न पाहता तात्काळ ओबीसी कोट्यातून 50 टक्केच्या आत आरक्षण जाहीर करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
