• Thu. Oct 16th, 2025

मराठी पत्रकार परिषदेच्या कोषाध्यक्षपदी मन्सूर शेख यांची बिनविरोध निवड

ByMirror

Oct 11, 2024

मुंबई येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत निर्णय

नगर (प्रतिनिधी)- 86 वर्षांची देदीप्यमान परंपरा असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवडी करण्यात आल्या असून, यामध्ये नगरचे मन्सूरभाई शेख यांची कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. मुंबई येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत निवडणूक निर्णय अधिकारी अनिल भोळे यांच्या वतीने एस.एम. देशमुख यांनी बुधवारी (दि.9 ऑक्टोबर) ही घोषणा केली.


मन्सूरभाई शेख यांची कोषाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने एस.एम. देशमुख यांनी त्यांचा सत्कार करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी परिषदेचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कार्याध्यक्ष म्हणून सांगलीचे पत्रकार शिवराज काटकर आणि सरचिटणीस म्हणून परभणीचे पत्रकार सुरेश नाईकवाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. रोह्याचे मिलिंद अष्टीवकर हे परिषदेचे नवे अध्यक्ष आहेत. मुंबई येथे झालेल्या परिषदेच्या सर्वसाधारण सभेसाठी राज्याच्या विविध भागातून आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.


मन्सूरभाई शेख यांनी यापूर्वी नाशिक विभागीय सचिव व राज्य सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


नवीन कार्यकारिणीने परिषदेची सूत्र हाती घेतली असून, आता पुढील पंधरा दिवसांमध्ये कार्यकारिणी सदस्य, उपाध्यक्ष, विभागीय सचिव, उपाध्यक्ष पदाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती एस.एम. देशमुख यांनी दिली. बैठक यशस्वी करण्यासाठी मुंबई विभागाचे सचिव दीपक कैतके, अध्यक्ष राजा आदाटे, दीपक पवार आदिंनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *