नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी रंगणार कुस्त्यांचा थरार
महाराष्ट्र केसरी गटातील विजयी मल्लांना 2 किलो चांदीची गदा बक्षीस जाहीर
अहमदनगर (प्रतिनिधी)- वरिष्ठ राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा (अधिवेशन) व महाराष्ट्र केसरी किताब लढत 2023 स्पर्धेसाठी केडगाव देवी रोड येथे होणाऱ्या जिल्हा निवड चाचणीचे मैदान पूजन ज्येष्ठ पैलवान महादेव अण्णा कोतकर यांच्या हस्ते झाले. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केडगाव देवीच्या यात्रेनिमित्त रविवारी (दि.22 ऑक्टोबर) या जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे. महाराष्ट्र केसरी गटातील माती व गादी विभागातील विजयी मल्लांना 2 किलो चांदीची गदा बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
प्रारंभी हनुमानजीच्या प्रतिमेस अभिवादन करुन मैदानाची पूजा करण्यात आली. तर जिल्हा निवड चाचणीच्या भिंती पत्रकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी अहमदनगर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे, निवड चाचणी स्पर्धेचे आयोजक पै. हर्षवर्धन कोतकर, नगरसेवक पै. संग्राम शेळके, पै. विजय पठारे, पै. श्यामभाऊ लोंढे, पै. संतोष कोतकर, पै. संग्राम कोतकर, जिल्हा तालीम संघाचे खजिनदार पै. नाना डोंगरे, कार्याध्यक्ष पै. अजय अजबे, उद्योजक अभिजीत कोतकर, ॲड. वैभव कदम, पै. अंगद महानवर, राजू कोतकर, अमोल खाकाळ, विठ्ठल महाराज कोतकर, शिवाजी कोतकर, माजी नगरसेवक सुनिल भिंगारे, सुनिल (मामा) कोतकर, संतोष डमाळे, दत्ता कोतकर, गणेश भोसले, रामदास काकडे, सुर्यभान नांगरे आदींसह जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी व केडगाव ग्रामस्थ उपस्थित होते.

पै. वैभव लांडगे म्हणाले की, या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व तालुक्यातील निवड चाचण्या होऊन विजयी झालेले मल्ल जिल्हा निवड चाचणीत खेळणार आहे. तर जिल्हा निवड चाचणीत विजयी मल्ल महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. जिल्ह्याला मोठी परंपरा व इतिहास असलेल्या कुस्ती खेळाला चालना देण्यासाठी जिल्हा तालीम संघाच्या माध्यमातून प्रयत्न सुरु असून, तर विविध स्पर्धेच्या माध्यमातून कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्याचे कार्य सातत्याने सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
नाना डोंगरे म्हणाले की, कुस्ती खेळाला चांगले दिवस आले असून, कुस्तीपटूंनी करियरच्या दृष्टीकोनातून या खेळाकडे पहावे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजयी मल्लांना सरकारी नोकरीत आरक्षण मिळत आहे. तर यामध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना दहावी, बारावीला 25 गुण दिले जात आहे. तर यश मिळवणाऱ्या कुस्तीपटूंना राज्य सरकारकडून मानधन देखील मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
पै. हर्षवर्धन कोतकर म्हणाले की, केडगावला महाराष्ट्र केसरीसाठी जिल्हा निवड चाचणी घेण्याचा दुसऱ्यांदा मान मिळाला आहे. यावेळी देवीची यात्रा व कुस्ती स्पर्धेचा योग जुळून आला आहे. गादी-माती विभागात ही स्पर्धा होणार असून, जिल्ह्यातील पाचशे पेक्षा जास्त मल्ल या स्पर्धेत उतरणार आहे. चांदीच्या गदेसह विविध गटातील विजेत्यांना बक्षीस दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने धाराशिव (उस्मानाबाद) येथे 66 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्याचा संघ पाठविण्यासाठी केडगावला जिल्हा निवड चाचणीचे दिमाखदार नियोजन करण्यात आले आहे. देवी रोड जवळील मोठ्या मैदानात आखाडा तयार करण्याचे काम सुरु आहे. मैदानाची स्वच्छता करुन त्याचे पूजन करण्यात आले. दीड ते दोन हजार प्रेक्षकांना बसण्यासाठी मैदानात सोय केली जाणार आहे. गादी व लाल मातीच्या आखाड्याचे काम सुरु आहे. रविवारी सकाळ ते संध्याकाळपर्यंत कुस्त्या चालणार आहे. या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण लाल मातीतून सिने सृष्टीत गेलेले पै. अमोल लंके व महाराष्ट्रातील मल्ल व वस्ताद या कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित राहणार आहेत.