मूकबधिर विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप
महापुरुषांची जयंती फक्त डिजे लावून नाचण्यासाठी नव्हे, तर त्यांच्या विचारांचा अंगीकार करण्यासाठी व्हावी -संतोष जाधव
नगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग, सावेडी येथील अपंग संजीवनी सोसायटी संचलित मूकबधिर विद्यालय व वसतीगृहात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्तपणे जयंती साजरी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते संतोषभाऊ जाधव यांच्या पुढाकाराने भारतीय बौध्द महासभेच्या वतीने मूकबधिर विद्यालय व वसतीगृहातील मुलांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले.
प्रारंभी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.दोन्ही महापुरुषांना वंदना वाहण्यात आली. याप्रसंगी संतोषभाऊ जाधव, भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष बौध्दाचार्य दीपक पाटोळे, शहर संघटक संजय डहाणे, संजय वायकर, ॲड. भारत कांगुर्डे, ॲड. चिराग दुसेजा, अमित विधाते, सोहम सचिन जाधव, मयूर भिंगारदिवे, भूपेंद्र चव्हाण, लक्ष्मण माघाडे, राजेंद्र पाडळे, डी.के. साळवे, बाळासाहेब गायकवाड, रविंद्र कांबळे, नित्यानंद कांबळे, मोहन शिरसाठ, राम गायकवाड, अर्चना गायकवाड आदींसह सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.
संतोषभाऊ जाधव म्हणाले की, समाजातील उपेक्षित व दुर्बल घटकांसमेवत महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्तपणे जयंती साजरी होण्यासाठी दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येतात. महापुरुषांच्या विचाराने वंचित, दुर्लक्षीत घटकातील विद्यार्थ्यांना आधाराबरोबर प्रेम देण्याची गरज असून, या भावनेने हा उपक्रम राबविण्यात आला. महापुरुषांची जयंती फक्त डिजे लावून त्यावर नाचणे नसून, त्यांच्या विचारांचा अंगीकार करुन वाटचाल करण्यासाठी असल्याचे त्यांनी सांगितले.
बौध्दाचार्य दीपक पाटोळे यांनी महापुरुषांनी केलेल्या त्यागातून व कार्यातून सक्षम भारताची पायाभरणी झाली आहे. आजच्या नव्या पिढीला त्यांच्या त्यागाची व कार्याची जाणीव करुन देण्याची गरज आहे. दीनदुबळ्यांना आधार व नवयुवकांना प्रेरणा देण्यासाठी हा उपक्रम दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. अपंग संजीवनी सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मधुकर भावले व संचालिका विद्या भावले यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करुन आभार मानले. याप्रसंगी वस्तीगृहाचे विद्यालयाचे दिलीप जगधने, पल्लवी कदम, कोतकर सर, रेणुका पवार उपस्थित होत्या.