गावात स्वच्छता अभियान राबवून प्लास्टिक मुक्तीचा संदेश
निरोगी आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छतेचा जागर
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, नवनाथ विद्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने गावात स्वच्छता हीच सेवा उपक्रमातंर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तर नवनाथ विद्यालय व ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
गावात राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिम व अभिवादन कार्यक्रमात सरपंच लताबाई फलके, ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड, ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, ज्येष्ठ शिक्षिक निळकंठ वाघमारे, क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार, अमोल वाबळे, लहानू जाधव, प्रमोद जाधव, किरण जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, प्रतिभा डोंगरे, संजय कापसे, अनिल डोंगरे, ज्ञानदेव कापसे, पिंटू जाधव, दिपक जाधव, मंदाताई डोंगरे, शिवाजी पुंड आदींसह ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावातील नवनाथ विद्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, नवनाथ मंदिर, मस्जिद व तालिम परिसरात स्वच्छता करण्यात आली. या परिसरातील कचरा साफ करुन, काटेरी गवत झाडे-झुडपे हटविण्यात आली. तर स्वच्छता अभियानातून प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यात आला. नवनाथ विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावर भाषणे केली.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, महात्मा गांधींनी दाखवलेला सत्य, अहिंसेचा मार्ग आजही भावीपिढीसाठी दिशादर्शक आहे. महापुरुषांच्या विचार आत्मसात करुन त्यांच्या कार्याची प्रेरणा घेतल्यास जीवनात यश मिळणार आहे. जय जवान, जय किसानचा नारा देऊन भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी देशाला विकासात्मक दिशा दिली. आज महात्मा गांधी यांच्या विचाराने सार्वजनिक स्वच्छतेची गरज असून, निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता हीच खरी सेवा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छतेतून संपूर्ण जगाला सक्षम भारताचे दर्शन घडणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या जयंती कार्यक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात, जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीपराव दिघे यांचे मार्गदर्शन लाभले.
