तीन वर्षांची गुलामगिरी, दीड वर्षांचा उपचारप्रवास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर मिळाले घरच्यांचे कुशीतले स्थान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तीन वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेला, ओळख, गाव, भाषा आणि नाव विसरलेला प्रवीण तुकाराम माळोवदे (वय 32, रा. हुबळी, जि. धारवाड, कर्नाटक) अखेर आपल्या घरात परतला. हरवलेला चेहरा आणि हरवलेली ओळख दीड वर्षांच्या उपचारानंतर आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या पूर्णतेनंतर पुन्हा आपल्या कुटुंबाच्या कुशीत पोहोचला.
19 डिसेंबर 2023 रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशन व श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ, अहिल्यानगर यांच्या संयुक्त कारवाईतून प्रवीणची गुलामगिरीतून मुक्तता करण्यात आली. त्यावेळी त्याची अवस्था अत्यंत दयनीय होती. डोळ्यांत भिती, शरीर अशक्त, मन पूर्णतः हरवलेले.
त्याला तत्काळ अरणगाव (मेहेराबाद) येथील मानवसेवा प्रकल्प या केंद्रात दाखल करण्यात आले. येथे संस्थापक दिलीप गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार व पुनर्वसनाला सुरुवात झाली. औषधोपचार, समुपदेशन, सेवकांची प्रेमळ काळजी आणि सतत दिलेला आधार यामुळे प्रवीण थोडा थोडा सावरू लागला. तो हसू लागला, संवाद साधू लागला; परंतु मी कोण आहे? हा प्रश्न मात्र कायम राहिला.
भाषेचा अडथळा मोठा होता. प्रवीण कर्नाटकी मराठी-मिश्रित भाषा बोलत असल्याने त्याचा मूळ पत्ता लावणे कठीण गेले. तरीही कार्यकर्त्यांनी हार मानली नाही. तब्बल सहा महिन्यांच्या प्रयत्नांनंतर हुबळी (जि. धारवाड, कर्नाटक) येथील त्याचा पत्ता लागला. स्थानिक पोलीस स्टेशनशी सतत संपर्क साधल्यानंतर शेवटी त्याचे कुटुंब शोधण्यात यश आले.
घरच्यांना ही बातमी समजताच त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. आमचा प्रवीण सापडला! या एका वाक्याने त्यांच्या आशा पुन्हा जाग्या झाल्या. प्रवीणला श्रीगोंदा न्यायालयाच्या आदेशानुसार प्रकल्पात दाखल करण्यात आले असल्याने, परवानगीशिवाय त्याला सोडणे शक्य नव्हते. प्रवीणची भाषा न्यायालयाला समजली नाही, त्यामुळे दोन वेळा न्यायालयाने त्याला घरच्यांच्या ताब्यात देण्यास नकार दिला. त्या क्षणी कुटुंबासमोर हृदयद्रावक प्रसंग उभा राहिला.
शेवटी, ॲड. वृषाली तांदळे यांच्या कायदेशीर मदतीने प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि न्यायालयाने कुटुंबाच्या ताब्यात देण्यास मान्यता दिली. संस्थेचे स्वयंसेवक राहुल साबळे व शुभम हंबीरराव यांनी प्रवीणला हुबळी येथे सुरक्षित पोहोचवले. वर्षानुवर्षे हरवलेला चेहरा अखेर आपल्या घरच्यांच्या कुशीत परतला. तीन वर्षांची गुलामगिरी, दीड वर्षांचा उपचारप्रवास आणि शेवटी घराचे मायेचे स्थान प्रवीणच्या आयुष्याला नवे वळण मिळाले.
प्रवीणच्या मुक्तता, उपचार व पुनर्वसनासाठी मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर, डॉ. सुरेश घोलप, तसेच स्वयंसेवक अंबादास गुंजाळ, सिराज शेख, मंगेश थोरात, गोरख धात्रक, मयुरी वनवे, संध्या कुलकर्णी, ऋतिक बर्डे, बाळासाहेब घुंगरे, सोमनाथ बर्डे, मथूरा बर्डे, शोभा दुधवडे यांनी परिश्रम घेतले. याशिवाय बेलवंडी पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल मगर, कित्तूर पोलीस स्टेशनचे (कर्नाटक) पोलीस उपनिरीक्षक हणमंत धर्मट्टी यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.
गरज आहे फक्त एका मदतीच्या हाताची
ही कथा प्रवीणची असली, तरी अशा कितीतरी प्रवीण आपल्या आजूबाजूला आहेत. गरज आहे फक्त मदतीच्या हाताची आणि माणुसकीच्या स्पर्शाची -दिलीप गुंजाळ (संस्थापक, श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ)