• Thu. Jan 1st, 2026

राधाकृष्ण मंदिराच्या उत्सव मिरवणुकीत अवतरले प्रभू श्रीराम, सिता, लक्ष्मण व हनुमान

ByMirror

Jan 23, 2024

अयोध्येत राम मंदिरात झालेल्या प्रभू श्रीराम मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा उत्सव

राममय वातावरणात दीपोत्सव साजरा

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील पंजाबी सनातन धर्म सभेच्या राधाकृष्ण मंदिराच्या वतीने शहरातून सोमवारी (दि.22 जानेवारी) संध्याकाळी आनंदोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर ढोल-ताशांच्या गजरात उत्सव मिरवणुक काढण्यात आली. भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरणात निघालेल्या शोभायात्रेत समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. तर राममय वातावरणात मंदिरामध्ये दीपोत्सव सोहळा पार पडला.


लालटाकी सर्जेपूरा येथून उत्सव मिरवणुकीचे प्रारंभ झाले. ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या मिरवणुकीत ट्रस्टचे सर्व विश्‍वस्त, सेवाप्रीतच्या महिला सदस्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. महिलांनी पिवळ्या रंगाच्या थीमवर वेशभूषा केली होती.

पारंपारिक वाद्यांसह निघालेल्या शोभायात्रेत घोड्यांच्या रथामध्ये स्वार भगवान श्रीराम, सिता व लक्ष्मणच्या झाकीने सर्वांचे लक्ष वेधले. तर हनुमानजींच्या वेशभूषेतील युवक मिरवणुकीचा आकर्षण ठरला. लहान चिमुकले देखील प्रभू श्रीरामच्या वेशभूषेत मिरवणुकीत सहभागी झाले होते. समाज बांधवांसह महिलांनी देखील उत्सव मिरवणुकीत ठेका धरला होता. मिरवणुकीत सहभागी महिलांनी रामलल्लावर भक्ती गीत सादर केली.


सर्जेपूरा चौकात पोखरणा परिवाराच्या वतीने मिरवणुकीवर फुलांचा वर्षावाने स्वागत करुन भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. तर ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणुकीचे स्वागत झाले. मंदिरा समोर मिरवणुकीचा समारोप झाला.

मंदिरात महिलांनी दीपोत्सव करुन प्रभू श्रीरामची आरती केली. यावेळी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम रंगले होते. राधाकृष्ण मंदिर ट्रस्ट, पंजाबी सेवा समिती व सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनच्या सहकार्याने हा उत्सव सोहळा साजरा करण्यात आला. सेवाप्रीतच्या वतीने भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवाप्रीतच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *