राष्ट्रीय लोक अदालतीत 9 प्रकरणांचा सलोख्याने निकाल, 58.67 लाखांची तडजोड
कौटुंबिक न्यायालयात पक्षकारांना मिळाला दिलासा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वेळ, पैसा आणि मानसिक तणाव वाचविण्यासाठी लोक न्यायालयाद्वारे वादांचे सामोपचाराने निराकरण होणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश संगीता भालेराव यांनी केले. कौटुंबिक न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
न्यायाधीश भालेराव पुढे म्हणाल्या की, न्यायालयीन खटले दीर्घकाळ चालतात. त्यातून दोन्ही पक्षांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागतो. लोक अदालतीच्या माध्यमातून सामंजस्याने तडजोड होऊन वाद मिटल्यास दोन्ही पक्षांना दिलासा मिळतो. त्यामुळे लोकांनी लोक अदालतीचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या राष्ट्रीय लोक अदालतीसाठी पॅनल प्रमुख न्यायाधीश श्रीमती जे. डी. ऊपरकर, पॅनल सदस्य ॲड. भक्ती शिरसाठ, कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण कचरे, उपाध्यक्ष ॲड. सुरेश लगड, संस्थापक अध्यक्ष ॲड. शिवाजी कराळे, कार्याध्यक्ष ॲड. शिवाजी सांगळे, ॲड. आशा गोंधळे, ॲड. सौ. पंडित यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या लोक अदालतीमध्ये जवळपास 200 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 9 प्रकरणांमध्ये यशस्वी तडजोड होऊन संबंधित पक्षकारांना एकूण 58 लाख 67 हजार रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली. यामुळे अनेक कुटुंबीय व पक्षकारांना दिलासा मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. शिवाजी सांगळे यांनी केले. आभार ॲड. राजेश कावरे यांनी मानले. लोक अदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी प्रबंधक नितीन धोंगडे, सहा अधिक्षक आसिफ शेख, सौ. एस. एस. चव्हाण, रोहित गुंडू, धीरज नारखेडे, सचिन जाधव, श्रीमती एल. एस. जाधव, पोलीस कर्मचारी सौ. ए. ए. शिंदे व श्री एन. ए. कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
