• Thu. Mar 13th, 2025

लिटिल जीनियस प्री प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

ByMirror

Mar 5, 2025

सांस्कृतिक कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन

चिमुकल्यांच्या दिंडी सोहळ्याने वेधले लक्ष

नगर (प्रतिनिधी)- मधुर बहुउद्देशीय संस्था संचलित बोल्हेगाव फाटा येथील लिटिल जीनियस प्री प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्याविष्कारातून उपस्थितांची मने जिंकली. शाळेच्या आवारात झालेल्या स्नेहसंमेलनात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले. वारकाऱ्यांची दिंडी, कोळी नृत्य व लोककलेचे सादरीकरण करुन कार्यक्रमाची रंगत वाढवली. हिंदी-मराठी गीतांसह शास्त्रीय नृत्याचे बहारदार सादरीकरण करण्यात आले.


या स्नेहसंमेलनाप्रसंगी आमदार संग्राम जगताप, डॉ. प्रभाकर पवार, डॉ. विलास जाधव, डॉ. ज्योती चोपडे, स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे, माजी विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर, माजी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, साहेबराव सप्रे, संस्थेचे अध्यक्ष अर्जुन खिळे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


आमदार संग्राम जगताप म्हणाले की, पूर्व प्राथमिक शाळेत मुलांमध्ये संस्काराची रुजवण करुन त्यांच्या भविष्याचा पाया रचला जातो. भारताला विश्‍वगुरू करण्यासाठी सक्षम भावी पिढी घडवावी लागणार आहे. यासाठी शिक्षकांचे योगदान मोलाचे ठरणार आहे. मुलांचा बौध्दिक विकास लहानपणी झाल्यास भविष्यात ही मुले पुढे जातात. इंग्रजी भाषेचे ज्ञान देतांना मुलांवर संस्कार रुजविणे देखील महत्त्वाचे आहे. विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांबरोबरच पालकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.


स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सरस्वती पूजन करुन दीपप्रज्वलनाने झाले. प्रारंभी विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष अर्जुन खिळे यांनी गेल्या सहा ते सात वर्षापासून शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षणासह विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. याशिवाय कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना चालना देण्याचे काम केले जात असल्याचे सांगितले. तर उपस्थित पाहुण्यांचा परिचय करुन दिला.
संस्थेचे सचिव तथा प्राचार्या मोहिनी खिळे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची माहिती देऊन, जागतिक राज्यभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांच्या साहित्यावर प्रकाश टाकला आणि इंग्रजी भाषेत शिक्षण घेत असले तरी मातृभाषा असलेल्या मराठी भाषेचे संवर्धन करण्याचे त्यांनी आवाहन केले.


मधुरा खिळे यांनी अहवाल वाचन केले. डॉ. प्रभाकर पवार यांनी जीवनात नेहमी वेगवेगळ्या कल्पना वापरून प्रगती करा आणि इंग्रजी भाषा जरी आपण आत्मसात करीत असलो, तरी मराठी भाषेची आपली नाळ तुटू देऊ नये, असे त्यांनी सांगितले. डॉ. विलास जाधव यांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते कला, क्रीडा, शैक्षणिक व विविध स्पर्धेत नैपुण्य मिळवणाऱ्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व माता पालकाचा पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गुण गौरव करण्यात आला. स्टुडन्ट ऑफ द इयर पुरस्कार आरव वारे या विद्यार्थ्यास प्रदान करण्यात आला. शाळेत बेस्ट टीचर अवॉर्डने नेहा बेल्हेकर व डेडिकेटेड अवॉर्ड अश्‍विनी बर्गे यांना सन्मानित करण्यात आले.


गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विविध हिंदी-मराठी गीतांवर विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम रंगला होता. सांस्कृतिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना दाद दिली. विद्यार्थ्यांनी श्‍लोक, भाषणे आदी कलाविष्कार सादर केले. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षिका अश्‍विनी बर्गे, साक्षी वांडेकर, आर. गायत्री, छाया कुत्तरवाडे, ऋतिक ताकपेरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्‍विनी जैन यांनी केले. आभार नेहा बेल्हेकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *