लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा संयुक्त उपक्रम
वाहनचालकांनी स्वत:सह इतरांच्या सुरक्षतेसाठी नियमांचे पालन करुन कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडाव्या -उर्मिला पवार
अहमदनगर (प्रतिनिधी)- दरवर्षी दीड लाख नागरिक अपघातामध्ये मृत्यूमुखी पडत आहे. परिस्थितीचे भान ठेवून व नियमांचे पालन करुन वाहन चालकांनी आपल्यासह इतरांना देखील सुरक्षित ठेवले पाहिजे. अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांचे कुटुंब उध्वस्त होतात. वाहनचालकांनी स्वत:सह इतरांच्या सुरक्षतेसाठी नियमांचे पालन करुन कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी केले.

लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी अवजड वाहन चालकांची नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी पवार बोलत होत्या. याप्रसंगी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गोरक्ष कोरडे, सूरज उबाले, कल्पेश सूर्यवंशी, सुकन्या क्षेत्रे, प्रियंका चोथे, रुपाली खरसे, अमृता वांढेकर, वरिष्ठ लिपिक प्रशांत शिंदे, लायन्स क्लबचे अध्यक्ष धनंजय भंडारे, सचिव दिलीप कुलकर्णी, खजिनदार नितीन मुनोत, डॉ. अंजू घुले, विजय कुलकर्णी, अजित शिंगवी आदी उपस्थित होते.
पुढे पवार म्हणाल्या की, दंडात्मक कारवाई ही पैश्यासाठी नव्हे, तर शिस्त लावण्यासाठी आहे. दंडात्मक कारवाईतून शिस्त लागावी, वाहनचालकांमध्ये नियम पालण्याचा धाक निर्माण व्हावा या उद्देशाने आहे. यामुळे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात असून, दंडाच्या रकमेतही वाढ करण्यात आलेली आहे. रस्ता सुरक्षा सप्तांतर्गत कार्यालयाच्या माध्यमातून वाहन चालकांची आरोग्य व नेत्र तपासणीचा उपक्रम राबविण्यात येतो. वाहनचालकांसाठी डोळे हा महत्त्वाचा इंद्रिय असून, वेळोवेळी त्यांची डोळे तपासणी केली जाते. तर त्यांच्यासाठी चष्मा देखील मोफत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. वाहन चालकांच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी देखील कार्यालय प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांनी दिली.

समृद्धी महामार्ग व इतर महामार्गावर लेन कटिंग, वेग मर्यादेचे नियम न पाळल्याने अपघात घडलेले आहे. मद्य प्राशन करुन वाहन चालविल्याने देखील अनेक अपघात घडत आहे. जन्म एकदाच असून, अपघातामध्ये जीवन संपू नये, असेही पवार म्हणाल्या.
धनंजय भंडारे म्हणाले की, वाहन चालकांसाठी डोळे उत्तम राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अवजड वाहन चालकांनी नियमांचे पालन करुनच वाहन चालवावे त्यांची एखादी चूक समोरच्या व्यक्तीच्या जीवावर बेतू शकते. चूक नसताना देखील समोरच्या व्यक्तीचा जीव जातो. यासाठी वेग मर्यादा व वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, रस्ते मात्र तेवढेच आहे. यासाठी नियम पाळणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिबिरात उपस्थित अवजड वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देवून, आरोग्याबाबत वेळोवेळी शारीरिक तपासण्या करण्याचे सांगण्यात आले. डॉ. अंजू घुले यांनी वाहन चालकांची नेत्र तपासणी केली. या शिबिराला अवजड वाहन चालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भावना नायर, वैभव सालवी, शितल घोगरे, अभिजीत जाधव, मेघा ठोकळे, शंकेश घुसळे आदींसह श्रीदीप हॉस्पिटलचे सहकारी, लायन्स क्लबचे सदस्य व उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
