फलटण येथे 16 मे रोजी तेराव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात होणार गौरव
नगर (प्रतिनिधी)- मराठी साहित्य मंडळ (मुंबई) यांच्या वतीने अहिल्यानगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक त्र्यंबकराव उर्फ बाळासाहेब देशमुख यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले जीवन गौरव साहित्य भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
फलटण येथे 16 मे रोजी होणाऱ्या तेराव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देशमुख यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट यांनी दिली.
बाळासाहेब देशमुख हे अहिल्यानगर जिल्ह्याचे मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांची आतापर्यंत श्रीक्षेत्र मांडवगण आणि सिद्धेश्वर दर्शन, आबा मास्तर, माऊंटन मॅन, संत आईसाहेब महाराज देशमुख आणि संत पळसेकर महाराज ही धार्मिक व सामाजिक विषयांवरील पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. देशमुख यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.