• Thu. Jul 24th, 2025

केडगावमध्ये शनिवारी प्रा. वसंत हंकारे यांचे व्याख्यान

ByMirror

Jul 23, 2025

कधीही न समजलेले आई-बाप समजून घेताना! विषयावर युवक-युवतींना होणार मार्गदर्शन


युवा पिढी वाचवण्याचा एक प्रयत्न -प्रा. प्रसाद जमदाडे

नगर (प्रतिनिधी)- केडगाव ग्रामस्थांच्या पुढाकारातून युवा पिढी वाचवण्याच्या उद्देशाने शनिवार दि. 26 जुलै रोजी सायंकाळी 6.30 वाजता रेणुका माता मंदिर समोरील मैदानात प्रा. वसंत हंकारे यांचे मार्मिक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानात कधीही न समजलेले आई-बाप समजून घेताना! या विषयावर हंकारे युवक-युवतींना मार्गदर्शन करुन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. या व्याख्यानाला पालकांसह शालेय विद्यार्थी आणि युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


आई-वडील मुले-मुली या सर्वांना एकत्र आणणारा हा कार्यक्रम असणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता जसा काळ बदलत चालला आहे, तसे आई-वडिलांसोबतचे मुला-मुलींचे संबंध देखील बदलताना दिसत आहेत. आई-वडिलांबद्दलचा आदर, नम्रता या गोष्टी कमी होताना दिसत आहेत. आई वडिलांसोबतचे मुलांचे बोलणे, जस-जसे मुले मोठे होतील तसेच कमी होताना दिसत आहे. मुले-मुली निर्णय घेत असताना आई-वडिलांचा सल्ला घेताना दिसत नाहीत. काही मुलांना वाटते की आपण सांगितले तर आई वडील बोलतील, रागवतील, मारतील.. तर काहींना वाटते की आपल्या आई-वडिलांना काय कळतंय! ते काय एवढे शहाणे आहेत का? त्यामुळे आई वडील आणि मुलं यांच्यातील दुरावा वाढत आहे. हाच दुरावा कमी करण्यासाठी कुटुंबाची नाळ पुन्हा एकदा एकत्र बांधण्यासाठी आणि युवा पिढी वाचवण्याचा एक प्रयत्न म्हणून या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रा. प्रसाद जमदाडे यांनी सांगितले. आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *