दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या अद्यावत शिक्षणासाठी पुढाकार
चांगले विद्यार्थी घडल्यास सक्षम भारत घडणार -जागृती ओबेरॉय
नगर (प्रतिनिधी)- दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना परीक्षा कालावधीत ई लर्निंगद्वारे अभ्यासाचा सराव होण्यासाठी सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने सर्जेपुरा, कोठला भागातील स्नेहालय संचलित उत्कर्ष बालभवनला एलसीडी टीव्ही भेट देण्यात आली. गरजू घटकांना सर्वसमावेशक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी सेवाप्रीत सोशल फाउंडेशनने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, या उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम राबविण्यात आला.
दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना ई लर्निंगद्वारे चांगल्या पद्धतीने अभ्यास करून परीक्षेला सामोरे जाता येणार आहे. याप्रसंगी सेवाप्रीतच्या संस्थापक अध्यक्षा जागृती ओबेरॉय, प्रकल्प प्रमुख रितू वधवा, भावना सचदेव, कविता दांडले, मीरा बारस्कर, सुरेखा बारस्कर, मनीषा उल्हारे, सुमन कपूर, प्रीती धुप्पड, सुनीता बक्षी, कुसुम सिंग, मीनाक्षी जाधव, वंदना ठुबे आदींसह महिला सदस्या उपस्थित होत्या. या एलसीडी टीव्हीचे बाल भवनच्या रुबिना शेख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना खाऊचे देखील वाटप करण्यात आले.
जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, सामान्यत: पुस्तकांवर आधारित शिकण्याच्या पद्धतीपेक्षा डिजिटल साधनांचा वापर विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे शिकवण्यास मदत करतो. ई लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना व गुणवत्ता प्राप्त होणार आहे. दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना देखील चांगले व दर्जेदार शिक्षण घेता यावे या उद्देशाने सेवाप्रीत सोशल फाउंडेशन योगदान देत आहे. चांगले विद्यार्थी घडल्यास सक्षम भारत घडणार असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
रितू वधवा यांनीही यावर भाष्य करताना सांगितले की, बाल भवनमधील मुलांना अधिक चांगल्या पद्धतीने शिकण्यासाठी व परीक्षेच्या तयारीसाठी ई लर्निंग महत्त्वाचे ठरणार आहे. या उपक्रमाद्वारे आम्ही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आहोत. सातत्याने दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात प्रोत्साहन देण्यासाठी सेवाप्रीत सोशल फाउंडेशन देत असलेल्या योगदानाची त्यांनी माहिती दिली.