स्वातंत्र्यानंतर प्रथमच आद्यनृत्यांगणा पवळा हिवरगावकर यांचा मरणोत्तर सन्मान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव टिकवणाऱ्या आणि मनोरंजनातून प्रबोधन करणाऱ्या तसेच महाराष्ट्राच्या ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या लावण्यवतींचा ऐतिहासिक सन्मान सोहळा मुंबईत पार पडला. अद्वैत थिएटर्स आणि काली बिल्ली प्रोडक्शनच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राची लावण्यवती पुरस्कार 2025 सोहळ्याचे आयोजन रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात मोलाचे योगदान देणाऱ्या तमाशा कलाक्षेत्रात प्रथम पदार्पण करणाऱ्या महिला व महाराष्ट्राच्या लावणीला मोठे वलय व उंची मिळवू दिली, अशा आद्यनृत्यांगणा पवळा भालेराव हिवरगावकर यांना स्वातंत्र्यानंतर प्रथमच मरणोत्तर सन्मान प्रदान करण्यात आला.
19 व्या शतकात पुरुष प्रधान संस्कृती व वर्ग व्यवस्थेची मोठी सामाजिक विषमता आशा परिस्थितीत प्रवाहाच्या विरोधात जाऊन विषमतावादी व्यवस्थेला ठोकर मारून नामचंद पवळा यांनी तमाशा क्षेत्रात प्रथम पाऊल टाकले. समाजात महिलांसाठी आदर्श व प्रेरणा निर्माण केली. छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापूर येथील राजदरबारा मध्ये मिठाराणीचे वगनाट्य पवळा भालेराव व पठ्ठे बापूराव यांनी सादर केले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात एक सोनेरी अध्याय लिहिला गेला.
अशा कलेच्या महान सम्राज्ञी पवळा भालेराव हिवरगावकर यांचा महाराष्ट्राची लावण्यवती मरणोत्तर पुरस्कार देऊन कला क्षेत्रातील अतुलनीय कार्याचा सन्मान करण्यात आला आहे. सदर पुरस्कार राज्य महिला आयोग मा.सदस्य ॲड.आशाताई लांडगे व श्रीमती शिल्पा पनाड यांच्या हस्ते पवळा यांचे पणतू नितीनचंद्र भालेराव आणि कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे अध्यक्ष श्रीकांत भालेराव यांनी स्वीकारला.
तसेच महाराष्ट्राची लोककला, संस्कृती आपल्या कलेच्या माध्यमातून देशाच्या सीमेवर पोहोचविणाऱ्या राष्ट्रपती पदक विजेत्या विठाबाई नारायणगावकर यांच्या स्मृतीचा जागर करत कला क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी बद्दल मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला. विठाबाई नारायणगावकर यांच्या कलेचा वारसा चालविणारे कैलास नारायणगावकर व कुटुंबीयांनी सदरचा पुरस्कार स्वीकारला. लोककला क्षेत्रात लावणीवर संशोधनात्मक अभ्यास करणाऱ्या,लावणी शास्त्रोक्त पद्धतीने सादर करणे, लावणी लोककला जतन व संवर्धनासाठी प्रयत्न करणाऱ्या तसेच लावण्य सम्राज्ञी व अभ्यासक रेश्मा मुसळे – परितेकर यांना महाराष्ट्राची लावण्यवती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अद्वैत थिएटर्स आणि काली बिल्ली प्रोडक्शनच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राची लावण्यवती पुरस्कार 2025 सोहळ्याच्या माध्यमातून आद्यनृत्यांगणा पवळा भालेराव आणि विठाबाई नारायणगावकर यांच्या कलेचा, स्मृतीचा जागर करण्यात आला. या महान कलावंताचे कला क्षेत्रातील अतुलनीय कार्य व योगदानाची अभ्यासपूर्ण माहिती कलेच्या माध्यमातून सादर करण्यात आली.महाराष्ट्राची लावण्यवती पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण मोरे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. कार्यक्रमास कला साहित्य सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
