• Thu. Oct 16th, 2025

बस स्थानकावर अडकलेल्या प्रवाशी, वाहक व चालकांची लंगर सेवेने भागवली भूक

ByMirror

Sep 4, 2023

अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठी चार्जमुळे महाराष्ट्रात तीव्र आंदोलन सुरु असताना एसटी महांडळाची सेवा दोन दिवसापासून ठप्प आहे. शहरातील तारकपूर बस स्थानक येथे अडकलेले प्रवाशी, एसटीचे वाहक व चालकांना गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवेच्या वतीने रविवारी (दि.3 सप्टेंबर) जेवण उपलब्ध करुन देण्यात आले. एसटीने नुकसान टाळण्यासाठी सेवा बंद ठेवली, मात्र प्रवाशांच्या अन्न सेवेसाठी लंगर सेवेचे सेवादार व लायन्स क्लब ऑफ अहमदनगरचे सदस्य सरसावले.


मराठा आंदोलकांवर जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठी चार्जमुळे शुक्रवारी (दि.1 सप्टेंबर) काही ठिकाणी एसटीची जाळपोळ झाल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. शनिवार व रविवारी लालपरीची सेवा ठप्प झाली होती. यामुळे सर्व बस आहे त्या ठिकाणच्या जवळच्या एसटी डेपोतच उभा करण्यात आल्या आहेत. यामुळे अनेक सर्वसामान्य प्रवाशी व एसटी कर्मचारी एसटी डेपोतच अडकून पडले आहे. यांच्या जेवणाची सोय होण्यासाठी घर घर लंगर सेवेच्या वतीने जेवण वितरीत करण्यात आले.


या लंगर सेवेचा बस स्थानकात अडकलेले प्रवाशी, एसटीचे वाहक व चालकांनी लाभ घेतला. तारकपूर बस स्थानकावर रात्री जेवण घेण्यासाठी मोठी रांग लागली होती. लोकांची गरज ओळखून सर्व लंगर सेवादारांनी योगदान दिले. यावेळी हरजितसिंह वधवा, जनक आहुजा, प्रितपालसिंह धुप्पड, लायन्स क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष धनंजय भंडारे, राजेंद्र कंत्रोड, अनिश आहुजा, कैलाश नवलानी, दलजितसिंह वधवा, राजू जग्गी, सोमनाथ चिंतामणी, सुनिल थोरात, गुलशन कंत्रोड आदी उपस्थित होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून गरजूंची भूक भागविणाऱ्या लंगर सेवेचा आधार आज आपल्या गावी जाण्यासाठी अडकलेल्या नागरिकांना मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *