• Wed. Mar 12th, 2025

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

ByMirror

Mar 1, 2025

गरबा नृत्य, आदिवासी नृत्य आणि महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील पारंपारिक गीतांवर नृत्याचे सादरीकरण

बालविवाह प्रतिबंध व स्त्री जन्माच्या स्वागतासाठी नाटिकेतून प्रबोधन

विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांबरोबरच पालकांचा सहभाग महत्त्वाचा -दादाभाऊ कळमकर

नगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. बालविवाह प्रतिबंध, स्त्री जन्माचे स्वागत आदी सामाजिक विषयांवर विद्यार्थ्यांनी स्वतः रेकॉर्ड केलेले नाटकीचे सादरीकरण केले. सांस्कृतिक कार्यक्रमातून स्त्री शक्तीचे दर्शन घडविले. गरबा नृत्य, आदिवासी नृत्य आणि महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील पारंपारिक गीतांवर नृत्याचे सादरीकरण करुन उपस्थितांची मने जिंकली.


लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झालेल्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन कर्मवीर भाऊराव व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करुन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेवराव पांडुळे, अर्जुनराव पोकळे, सल्लागार समिती सदस्य माजी प्राचार्य विश्‍वासराव काळे, माजी प्राचार्य कैलासराव मोहिते, श्‍यामराव व्यवहारे, विष्णुपंत म्हस्के, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका छायाताई काकडे आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रास्ताविकात मुख्याध्यापिका छायाताई काकडे यांनी शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षणासह विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. याशिवाय कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना चालना देण्याचे काम केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


दादाभाऊ कळमकर म्हणाले की, विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांबरोबरच पालकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. महिला पालक विद्यार्थ्यांना चांगले वळण लावू शकतात. गुणवंत विद्यार्थी घडविण्याचे काम रयत शिक्षण संस्थेत केले जात आहे. पालक-शिक्षकांनी सातत्याने लक्ष दिल्यास विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य घडणार आहे. स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून भविष्यातील कलाकार घडणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.


अर्जुनराव पोकळे यांनी विद्यार्थ्यांचे कलागुण ओळखून त्या दिशेने पालकांनी प्रोत्साहन द्यावे. शिक्षक-पालकांनी विद्यार्थ्यांचे कलागुण ओळखणे, हे आजच्या काळाची गरज निर्माण झाली असल्याचे सांगितले. रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभाग मध्ये आदर्श विद्यार्थी पुरस्काराचा मान मिळवणारा शाळेचा इयत्ता दहावी मधील विद्यार्थी अद्वैत विवेक गहाणडुले व या शैक्षणिक वर्षाची आदर्श विद्यार्थिनी श्रेया सुजित गोटे यांचा पाहुण्यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.


गणेश वंदनेने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी हिंदी-मराठी गीतांवर नृत्याचे सादरीकरण करुन कार्यक्रमाचा आनंद लुटला. विविध गाण्यांतून मराठी सणांचे दर्शन घडविण्यात आले. लुंगी डान्स…, पुष्पा पुष्पा…, मल्हारी… पिंगा ग पोरी पिंगा या गीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. आदिवासी गीतावर युवक-युवतींनी बेभानपणे नृत्य सादर केले. लाडकी बहिण योजना! या नाटिकेतून विद्यार्थ्यांनी संपूर्ण सभागृहाला खळखळून हसविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप पालवे व स्मिता पिसाळ यांनी केले. आभार ज्ञानदेव पांडुळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभाकर थोरात, सुनीता लांडगे, अमित धामणे, मंगेश कारखिले, उमेश विलायते, राजेंद्र देवकर, श्रीमती नागपुरे, सानप, खेंडके यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *