कोळीगीत, पंजाबी गीत, गवळण, पोतराज नृत्याने विविध संस्कृतीचे दर्शन
शाळेची चमकधमक न पाहता, गुणवत्ता पाहूनच मुलांची शाळा निवडावी -हेरंब कुलकर्णी
अहमदनगर (प्रतिनिधी)- शाळेची इमारत व भौतिक सुविधा हा शेवटचा मुद्दा असून, शाळेला गुणवत्तेवर महत्त्व दिले गेले पाहिजे. गुणवत्ता शाळेचा पाया ठरतो. पालकांनी शाळेची चमकधमक न पाहता, गुणवत्ता पाहूनच मुलांची शाळा निवडावी. अन्यथा मोठ-मोठ्या मॉल्समध्येही शाळा भरल्या असत्या, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी कुलकर्णी बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण उपसंचालक रमाकांत काठमोरे, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य अभिषेक कळमकर, ज्ञानदेव पांडुळे, अंबादास गारुडकर, अर्जुनराव पोकळे, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी लंके, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका छाया काकडे, काकासाहेब वाळुंजकर, श्यामराव व्यवहारे, विष्णूपंत म्हस्के, महादेव काठमोरे, इंजि. विजय बेरड, नारायण अनभुले, अनिल अकोलकर आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे कुलकर्णी म्हणाले की, गुणवत्तेने पुढे आलेल्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेने कमी वेळेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शाळा कुठे भरते याला अर्थ नसून, त्या शिक्षणाचा दर्जा उत्तम असला पाहिजे. इंग्रजी शाळांमध्ये सुख-सुविधांचे चित्र रंगवले जात असून, पालक देखील गुणवत्तेबद्दल बोलत नसल्याचे सांगितले. तर पालक मुलांना सर्वकाही सहज उपलब्ध करुन देत असल्याने त्यांना नकार व विरोध सहन करण्याची क्षमता कमी झाली आहे. विद्यार्थ्यांना काही गोष्टींना नकार दिल्यास त्यांच्याकडून हिंसक प्रतिसाद मिळत आहे. यासाठी पालकांना योग्य भूमिका घ्यावी लागेल. मुलांना मोबाईल व टीव्हीची वेळ ठरवून देण्याचे त्यांनी आवाहन केले. तर त्यांनी मुलांना कागदापासून माणूस बनवून दाखविला. टाळ्यांचा पाऊस व त्यांनी घेतलेल्या कवितांमुळे विद्यार्थी भारावले.

लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या प्रारंभी कर्मवीर भाऊराव व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांची प्रतिमा पूजन करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रास्ताविक प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी लंके यांनी केले. विद्यार्थ्यांनी स्वागत गीतांसह सादर केलेल्या रयतेमधून नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे… या गीतांनी सभागृह निनादले. 14 विद्यार्थ्यांपासून सुरु झालेल्या शाळेचा पाचशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा गाठलेला टप्पा, गुणवत्तेमुळे प्रवेशासाठी लागणारी प्रतिक्षायादी व विविध स्पर्धा परीक्षेत चमकलेल्या विद्यार्थ्यांचा व शाळेच्या सर्वांगीन गुणवत्तेचा आढावा घेणारा माहितीपट यावेळी दाखविण्यात आला.

शिक्षण उपसंचालक डॉ. रमाकांत काठमोरे म्हणाले की, उत्सुकता निर्माण करणारी शिक्षण पद्धती निर्माण केली जात आहे. यामुळे मुले शिक्षणात रममान होऊन त्यांच्यामधील जिज्ञासू वृत्ती वाढेल. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर विविध स्किल निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले. तर शूर, जिद्द, चिकाटी या सिंहासारख्या गुणवैशिष्ट्य आत्मसात करून आपल्या क्षेत्रात सिंहाप्रमाणे वावरण्याचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
अभिषेक कळमकर म्हणाले की, शाळेच्या आवारात, समाजात काही चुकीचे घडत असेल तर पालकांनी नागरिक म्हणून आवाज उठवावा. मोबाईलचे व्यसन मुलांना लागू नये, यासाठी पालकांनी देखील मुलांसमोर अधिक वेळ मोबाईल वापरण्याचे टाळावे. अद्यावत शिक्षणाने उत्तम व्यक्तिमत्व विकास घडविण्याचे काम रयत शिक्षण संस्थेत केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्ञानदेव पांडुळे यांनी आर्थिक विषमतेतून भारत, इंडिया हे दोन वर्ग समाजात दिसत आहे. श्रीमंत मुले इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतात तर गरीब मुले मराठी माध्यमात शिक्षण घेत आहेत. या विषमतेतून भारतात श्रीलंकेसारखी परिस्थिती उद्भवू नये यासाठी गरीब-श्रीमंताची दरी कमी करावी लागणार आहे. वंचितांसाठी सरकारला शैक्षणिक धोरण योग्य पद्धतीने राबवावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशातील विविध संस्कृतीचे दर्शन घडविले. प्रेक्षकांमधून अवतरलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्टेजवर झालेले आगमन व महाराजांच्या गीतांवर झालेल्या सादरीकरणाने सभागृहात शिवाजी महाराजांचा एकच जयघोष झाला. विविध हिंदी-मराठी गाण्यावर रंगलेल्या नृत्याने सांस्कृतिक कार्यक्रमात रंग भरला. मुलींनी बाईपण भारी देवा या चित्रपटाच्या गीतांमधून स्त्री शक्तीचा जागर केला. तर स्त्री भ्रूण हत्या थांबविण्याचा संदेश दिला. कोळीगीत, पंजाबी गीत, गवळण, पोतराज नृत्याने विविध संस्कृतीचे दर्शन घडविले. विविध वेशभुषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. विविध गीतांवर नृत्याचे बहारदार सादरीकरण करुन, चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना दाद दिली.
कला, क्रीडा, शैक्षणिक व विविध स्पर्धेत नैपुण्य मिळवणाऱ्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उर्मिला साळुंके, शिल्पा कानडे व प्रदीप पालवे यांनी केले. आभार ज्ञानदेव पाडुळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शालेय शिक्षक व शिक्षकेतरांनी परिश्रम घेतले.