दलित वस्तीसाठी पाण्याची टंचाई, ग्रामस्थांचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण
नगर (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील भावडी गावातील ग्रामपंचायतच्या विहिरीतून अनुसूचित जातीच्या समाजबांधवांसह ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळावे, तसेच विहिरीतून अनधिकृतपणे पाणी उपसा करणाऱ्या मोटारी काढाव्यात, या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर उपोषण करण्यात आले.
उन्हाळा सुरु झाल्याने पाण्याची टंचाई जाणवत असून ग्रामस्थांना पिण्यासाठी तसेच दैनंदिन गरजांसाठी पाणी मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणावर हाल सहन करावे लागत असल्याने यावेळी उपोषणकर्त्यांनी जोरदार निदर्शने देखील केले.या उपोषणात लहुजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष नवनाथ शिंदे, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय शिंदे, परशुराम शिंदे, जनार्दन चव्हाण, गोरक्षनाथ शिंदे, संजय शिंदे, सुनील शिंदे, संजय कोरडकर, दशरथ शिंदे, मुक्ताबाई शिंदे, वैशाली शिंदे, पूजा शिंदे, अर्चना शिंदे, संगीता शिंदे, राणी चव्हाण, उषा शिंदे, पार्वती शिंदे आदींसह गावातील अनेक ग्रामस्थ सहभागी झाले होते.
भावडी गावठाण येथील ग्रामपंचायत मालकीची विहीर पूर्णपणे शासकीय जागेत असून, उप अभियंता ग्रामपंचायतीने केलेल्या चौकशीतून विहीर ऑक्टोबर 1965 मध्ये खोदण्यात आल्याचे, तसेच सप्टेंबर 1998 मध्ये विद्युत पंपाची दुरुस्ती झाल्याचे निदर्शनास आले आहे.
तरीही शेजारील काही शेतकरी या विहिरीत अनधिकृत मोटारी टाकून शेतीसाठी पाणी वापरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे दलित वस्तीत पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, पिण्यासह दैनंदिन वापरासाठी आणि जनावरांसाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे.
ग्रामस्थांनी अनेकवेळा जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी करूनही योग्य प्रतिसाद मिळालेला नसल्यामुळे अखेर उपोषणाचा मार्ग पत्करल्याचे लहुजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष नवनाथ शिंदे यांनी सांगितले.