मातंग समाजाला अ,ब,क,ड नुसार आरक्षणाची वर्गवारी करण्यासह प्रलंबीत मागण्या घेऊन निघणार मोर्चा
वर्गवारी नुसार आरक्षण मिळाल्याशिवाय मातंग समाज स्वस्थ बसणार नाही -विष्णूभाऊ कसबे
अहमदनगर (प्रतिनिधी)- लहुजी शक्ती सेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. या बैठकीत मातंग समाजाला अ,ब,क,ड नुसार आरक्षणाची वर्गवारी करण्यासह इतर प्रलंबीत मागण्यांसाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर पदयात्रा काढण्याची घोषणा कसबे यांनी केली. अहमदनगर जिल्ह्यातून ही पदयात्रा जाणार असल्याने या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून नियोजन करण्यात आले.
या बैठकीसाठी संघटनेचे राज्य विधी सल्लागार ॲड. रंणजीत शिरोळे, प्रदेश सदस्य ज्ञानेश्वर जगधने, जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, युवक जिल्हाध्यक्ष उत्तम रोकडे, सुरेश शिरसाठ, लखन मिसाळ, लखन साळवे, संतोष उमाप, अभिजीत सकट, परशुराम शिंदे, नवनाथ शिंदे आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत लहुजी शक्ती सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करुन त्यांना कसबे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

विष्णूभाऊ कसबे म्हणाले की, समाज नव्याने आरक्षण मागत नाही, तर घटनेने दिलेल्या आरक्षणातील वर्गवारीचा हक्क मागत आहे. इतर समाजाला देखील सरकारने आरक्षण द्यावे. त्याचबरोबर मातंग समाजाला त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. राज्य सरकारचे शेवटचे हिवाळी अधिवेशन असून, निवडणुकीच्या तोंडावर मातंग समाजाला न्याय मागण्यांसाठी पेटून उठावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तर जो समाजाला न्याय देईल, त्या पक्षाबरोबर घटक पक्ष म्हणून लहुजी शक्ती सेना कार्य करणार आहे. मातंग समाजातील प्रश्न सुटले पाहिजे, राजकारणात त्यांना प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे या अपेक्षेने संघटनेचा संघर्ष सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वर्गवारी नुसार आरक्षण मिळाल्याशिवाय मातंग समाज स्वस्थ बसणार नसून, समाजाचा उद्रेक सरकारला महागात पडणार असल्याचा इशारा कसबे यांनी दिला.
अंदाजे 900 किलोमीटरची पुणे ते नागपूर पदयात्रा 29 दिवस चालणार आहे. या यात्रेचा सर्वाधिक मार्गक्रमण अहमदनगर जिल्ह्यातून राहणार असल्याने कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या उचलण्याचे स्पष्ट करण्यात आले. तर भावी पिढीच्या भवितव्यासाठी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
अनुसूचित जातीला एकत्रित 13 टक्के आरक्षण असून, अ,ब,क,ड नुसार आरक्षणाची वर्गवारी करावी, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावे, आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे नाव राष्ट्रीय पुरुषांच्या यादीत समावेश करावे, लहुजी वस्ताद साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळ बंद पडल्याने समाजातील युवकांवर बेरोजगारीचे संकट ओढवले असताना हे महामंडळाला भरीव आर्थिक तरतूद करून पुन्हा सुरु करावे या प्रमुख मागण्या घेऊन नागपुरच्या हिवाळी अधिवेशनवर लहुजी शक्ती सेनेची पदयात्रा धडकणार आहे.