• Thu. Oct 16th, 2025

लहुजी शक्ती सेनेचे पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण

ByMirror

Mar 15, 2024

देहरे व तिसगावात मागासवर्गीयांवर झालेल्या अन्याय, अत्याचारप्रकरणी आरोपींना अटक करण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- देहरे (ता. नगर) व तिसगाव (ता. पाथर्डी) येथे मागासवर्गीयांवर झालेल्या अन्याय, अत्याचारप्रकरणी ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल असताना आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण करण्यात आले. तर जिल्ह्यात वारंवार मागासवर्गीयांवर होत असलेल्या अन्याय, अत्याचाराचा निषेध नोंदविण्यात आला.


या उपोषणात लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे, म.रा. कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्‍वर जगधने, नामदेव चांदणे, सिताराम शिरसाठ, राजाराम काळे, लखन साळवे, नवनाथ जाधव, अनिकेत जाधव, नंदू जाधव, शिवाजी जाधव, किरण शिरसाठ, मनोज शिंदे, किशोर शिंदे, मनोज वाल्हेकर आदी सहभागी झाले होते.


तिसगाव (ता. पाथर्डी) येथे ड्रोन कॅमेराद्वारे सकाळी शौचास गेलेल्या लहान मुली व महिलांचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. सदर व्यक्तींना विचारणा केली असता, त्यांनी जातिवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. सकाळी शौचास गेलेल्या महिलांची शुटिंग घेवून त्यांची बदनामी करण्याचा आरोपींचा उद्देश होता. या प्रकरणात कोणत्याही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. आरोपीची पत्नी नायब तहसिलदार असल्याने आर्थिक देवाण-घेवाण होवून तपास अधिकारी आरोपींना अटक करत नसल्याचा आरोप लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आला आहे.


देहरे (ता. नगर) येथील प्रकरणात पान टपरी बाजूला हटवल्याचा राग येवून मागासवर्गीय युवकाची पान टपरीचे नुकसान करुन त्याला जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी करण्यात आली. टपरीच्या आतमध्ये ठेवलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे देखील नुकसान झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपींना अद्यापि अटक करण्यात आलेली नाही.

दोन्ही प्रकरणात मागासवर्गीयांचा छळ करणाऱ्या आरोपींना पाठिशी घालण्याचे काम पोलीस प्रशासनाने केले आहे. यामधील आरोपी गावात खुलेआमपणे फिरत असून, मागासवर्गीय पिडीतांना त्यांच्यापासून धोका असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करुन त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *