अन्याय निवारण समितीचे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील गट नंबर 37 मध्ये अवैधरित्या मुरूम उत्खनन व सपाटीकरण केल्याचा गंभीर आरोप होत असून, या प्रकरणाची लॅब टेस्ट करून पंचनामा सिव्हिल इंजिनिअरच्या उपस्थितीत करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भातील निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले असून, पंधरा दिवसांत कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
समितीच्या निवेदनानुसार, गट क्र. 37 पैकी मध्ये बनावट कागदपत्राद्वारे सपाटीकरणाची परवानगी घेण्यात आली, मात्र तेथे प्रत्यक्ष उत्खनन झालेच नसून बाहेरील गटातून मुरूम आणून अवैधरित्या भर टाकण्यात आला आहे. याप्रकरणी दाखल केलेल्या जबाबांवर खोट्या सह्या करण्यात आल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दिलेल्या जबाबांनुसार दिपाली राजेंद्र आव्हाड यांच्या क्षेत्रातून मुरूम उत्खनन करण्यात आले असल्याचे स्पष्ट होते. हॉस्पिटल बांधकामाच्या काळातही दिपाली आव्हाड यांनी बाहेरील गटातून मुरूम आणून भर टाकल्याने त्यांच्यावर शासनाने एक कोटी दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला होता, त्यापैकी त्यांनी फक्त वीस लाख रुपये भरणा केला असून उर्वरित रक्कम अद्याप थकबाकी आहे.
संघटनेने मंडलाधिकारी यांच्यावर संगनमत करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करत, त्यांच्यावर देखील फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणात भादंवि कलम 379 नुसार गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
भाळवणी येथील गट क्र. 37 मधील भर टाकलेल्या मुरूमाची लॅब टेस्ट सिव्हिल इंजिनिअरच्या उपस्थितीत करून पंचनामा तयार करण्याची मागणी करण्यात आली असून, सत्य परिस्थिती उघड करण्यासाठी शासनाकडून तपासणी समिती नेमावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
