निमगाव वाघात रंगला कुस्त्यांचा थरार; जिल्हा संघाची निवड
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नगर तालुका तालिम सेवा संघाच्या वतीने 45 वी कुमार राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा सन 2024-25 साठी जिल्हा निवड चाचणी उत्साहात पार पडली. गावातील आखाड्यात झालेल्या कुस्ती निवड चाचणीसाठी जिल्ह्यातील 80 खेळाडूंचा सहभाग लाभला. यावेळी मल्लांचे रंगतादार कुस्त्यांचा थरार रंगला होता.
जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या निवडचाचणीचे उद्घाटन नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसरपंच किरण जाधव, सोसायटीचे संचालक अतुल फलके, डॉ. विजय जाधव, बिरोबा देवस्थानचे भगत नामदेव भुसारे, पै. संदिप डोंगरे आदींसह खेळाडू उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने पै. श्री पंकज हारपुडे व पै. महेश मोहोळ मित्र परिवाराच्या वतीने 45 वी कुमार राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. 12 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्यान कै. मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल कात्रज पुणे या ठिकाणी होत आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्याचा संघ पाठविला जाणार असून, त्याची निवड या निवड चाचणीद्वारे करण्यात आली.
या निवड चाचणीत विविध वजन गटातील कुस्त्यांचे सामने रंगले होते. ओपन गटासाठी रोहिदास घोरपडे (पाथर्डी) याची निवड करण्यात आली असून, तो कुमार राज्यस्तरीय अजिंक्यपदासाठी खुल्या गटात लढणार आहे. तसेच या स्पर्धेत रवी गिते (नगर), अभिनव घोरपडे (पाथर्डी) यांच्यासह विविध वजन गटातील खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.